पुणे - नवीन विद्यापीठ कायद्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचा बिगुल अखेर मंगळवारी वाजला. विद्यापीठ प्रशासनाने पदवीधर व संस्थाचालकांच्या निवडणुकींच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या असून दि. १९ नोव्हेंबर रोजी निवडणुक होणार आहे. त्यासाठी बुधवार (दि. २५)पासून उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे.
राज्यात सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या अधिसभेच्या निवडणुक प्रक्रियेचे काम नवीन कायद्यानुसार सुरू आहे. अमरावती विद्यापीठाच्या निवडणुकांची संपुर्ण प्रक्रिया नुकतीच पार पडली. तर इतर विद्यापीठांमधील प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. मात्र, राज्यात शैक्षणिक गुणवत्तेसह सर्वच बाबतीत आघाडीवर असलेल्या पुणे विद्यापीठाची प्रक्रिया मात्र रेंगाळली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातून मागील काही दिवसांपासून नाराजी व्यक्त केली होती. संस्थाचालक, पदवीधर, प्राचार्य आणि प्राध्यापक या चारही मतदारसंघातील इच्छुक निवडणुक वेळापत्रकाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी विविध घटकांकडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. त्यामुळे काही दिवसांपासून निवडणुक घेण्यासाठी प्रशासनाकडून वेगाने हालचारी सुरू होत्या. त्यानुसार मंगळवारी पदवीधर व संस्थाचालकांच्या निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मात्र, प्राध्यापक व प्राचार्य मतदारसंघाच्या निवडणुकांचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या संस्थाचालकांचे ६ आणि पदवीधर मतदारसंघातून १० प्रतिनिधी निवडून दिले जाणार आहेत. संभाव्य वेळापत्रकानुसार, रविवार दि. १९ नोव्हेंबर रोजी पदवीधर व संस्थाचालक मतदारसंघासाठी मतदान होईल. त्यासाठी दि. २५ आॅक्टोबरपासून अर्ज सादर करता येणार आहे. तर दि. २ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येईल. दि. ३ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंबंधी दि. ६ नोव्हेंबर रोजी लेखी कळवावे लागेल. त्यानुसार निवडणुक होऊन दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतपत्रिकांची छाननी व मतमोजणीचे काम सुरू होईल.
निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक
दि. २५ आॅक्टोबर ते दि. २ नोव्हेंबर - उमेदवारी अर्ज सादर करणे
दि. ३ नोव्हेंबर - उमेदवारी अर्जाची छाननी
दि. ६ नोव्हेंबर - उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत लेखी कळविणे
दि. १९ नोव्हेंबर - मतदान
दि. २७ नोव्हेंबर - मतपत्रिकांची छाननी व मतमोजणी
प्राचार्य, प्राध्यापक निवडणुकीची प्रतीक्षा
पदवीधर व संस्थाचालक मतदारसंघाचे निवडणुक वेळापत्रक जाहीर झाले असले तरी प्राचार्य व प्राध्यापक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव अरविंद शाळीग्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राचार्य व प्राध्यापकांना आॅनलाईन मतदार नोंदणीसाठी २० आॅक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता नोंदणी केलेल्यांना २७ तारखेपर्यंत कागदपत्रे सादर करावी लागतील. त्यानंतर अर्जांची छानणी होवून मतदार यादी जाहीर केली जाईल. यादीवर हरकती मागवून नंतर अंतिम यादी प्रसिध्द केली जाईल. त्यानंतर निवडणुक होईल. पदवीधर व संस्थाचालक निवडणुकीसाठीची ही प्रक्रिया मागील महिन्यात पुर्ण झाली होती.