धनकवडी : "वाचाल तर वाचाल, हे जितके खरे आहे; तितकेच भारतीय संस्कृती वाचवायची असेल तर वाचन संस्कृती जपली पाहिजे, हे ही तितकेच खरे आहे. प्रत्येक वाढदिवस हा वाचन संस्कृती प्रेरणा दिन ठरला पाहिजे. या भूमिकेतून शहरी व ग्रामीण भागात वाचनालये उघडावीत व वाचन संस्कृती बळकट करण्यासाठी पुस्तक दान करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नरवडे यांनी केले आहे.
वंदेमातरम संघटना व कौशल्य विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नरवडे हे मागील पाच वर्षांपासून 'पुस्तक दान' संकल्पना राबवत आहेत. मित्र, नातेवाईक किंवा एखद्या मान्यवरांचा वाढदिवस साजरा करताना केक, पुष्पगुच्छ, भेटवस्तू ऐवजी जुनी किंवा नवीन वाचनीय पुस्तके दान करावीत, असे आवाहन या निमित्ताने केले जाते व जमा झालेल्या पुस्तकांचे शहरालगतच्या ग्रामीण भागात दान केले जातात. या उपक्रमाचे यंदाचे हे ६ वे वर्ष असून या उपक्रमास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. कोथरुड, शिवतीर्थ भागातून मोठ्या संख्येने पुस्तके जमा झाली. यामध्ये एकबोटे यांनी जवळपास १२० पुस्तके दान केली आहेत. यामध्ये काही धार्मिक, इंग्रजी कथा व मराठी वाचनीय पुस्तकांचे संच आहेत.
फोटो : प्रशांत नरवडे