पुणे : पुणे महापालिका हद्दीत बाहेरच्या शहरातून कुठल्याही वाहनाने प्रवेश करताना, आता ४८ तास वैधता असलेले कोरोना निगेटिव्ह तेही आरटीपीसीआर तपासणीचे प्रमाणपत्र संबंधित नागरिकाने सोबत बाळगणे आवश्यक केले आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबत शुक्रवारी आदेश जारी केले असून, आजपासून ते लागू करण्यात आले आहेत.
महापालिकेने जाहीर केलेल्या या नियमावलीत यापूर्वी लागू असलेले सर्व नियम कायम असून, बाहेरून आलेल्या नागरिकांसाठी आता कडक नियमावली केली आहे. कोरोना संसर्ग अधिक असलेल्या राज्यातून अथवा सेन्सेटिव्ह ठिकाणाहून येणाऱ्या नागरिकांना १८ एप्रिल व १ मेच्या आदेशानुसार अधिकचे निर्बंध लागू राहणार आहेत.
याचबरोबर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये केवळ ड्रायव्हर व क्लिनर यांनाच परवानगी राहणार आहे. तर अन्य राज्यातून आलेल्या मालवाहतूक वाहनातील ड्रायव्हर व क्लिनर यांनाही ४८ तास वैधता असलेले कोरोना निगेटिव्ह तेही आरटीपीसीआर तपासणीचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक केले आहे.