इंदापूर : आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेच्या हितासाठी निर्णय घेत असतात. राज्याचा विचार करूनच सर्व निर्णय घेतले जातात. शेवटी राज्य सरकारला प्रत्येक माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे लॉकडाउन आनंदाची गोष्ट नाही.परंतु माणसाचा जीव वाचला पाहिजे ही भूमिका सरकारची आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम व पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे रविवार ( दि. ४ ) रोजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. इंदापूर तालुक्याचे तहसीलदार अनिल ठोंबरे, इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ई. यु. देशपांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा उपस्थित होते.
भरणे म्हणाले की, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इंदापूर तालुक्यात हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे काटेकाेरपणे पालन सर्वांनी करावे. तालुक्यामध्ये २५ हजार नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. परंतु ही समाधानकारक आकडेचवारी नाही. ७५ हजार नागरिकांना लसीकरण करण्यात येणार असून उर्वरित ५० हजार नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
भिगवण येथे कोरोना उपचार सेंटर आहे. तेथे ऑक्सिजनची सुविधा तत्काळ उपलब्ध करण्यात येईल. तर बावडा येथे देखील कोरोना सेंटर उभारले जाईल, अशी ग्वाही राज्यमंत्री भरणे यांनी दिली.
चौकट..............
इंदपूरला लवकर मिळणार मुख्याधिकारी
इंदापूर तालुक्यातील ज्या कार्यालयांना अधिकारी नाहीत त्या सर्व कार्यालयांंना सक्षम अधिकारी दिले जातील. इंदापूर शहरातील नागरिकांच्या समस्या अडचणी खोळंबून राहू नयेत. म्हणून तत्काळ नगरपरिषदेला मुख्याधिकारी देण्यात येईल. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भरणे म्हणाले की, शहरात कोरोनाच्या नियमांची प्रशासनाने अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर शहरातील व्यापाऱ्यांनी १३ दिवसाला कोरोना चाचणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. लसीकरण वाढवण्यासंदर्भातही प्रशासनाने उपायोजना कराव्यात अशा सूचनाही त्यांनी केल्या. त्यानुसार प्रशासनाने सायंकाळी यासंदर्भात बैठक घेत चर्चा केली.
०४ इंदापूर बैठक
बैठकीत मार्गदर्शन करताना दत्तात्रय भरणे.