लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “पुण्यात सरसकट लसीकरणाला परवानगी द्यावी यासाठी केंद्राकडे मागणी करणार आहे. ज्या ठिकाणी जास्त कोरोनाबाधित आहेत त्या सर्वच ठिकाणी सरसकट लसीकरणाचे धोरण अवलंबावे, अशी मागणी खासदारांमार्फत केंद्र सरकारकडे करणार आहे,” असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुण्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.१२) विधान भवनात प्रशासकीय बैठक झाली. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, श्रीरंग बारणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार चंद्रकांत पाटील, मुक्ता टिळक, माधुरी मिसाळ, सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके आदी यावेळी उपस्थित होते.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शहरात सरसकट लसीकरणाला परवानगी द्यावी. तसेच केंद्राकडून आणखी लस पुरवठ्याची मागणी करावी, अशी चर्चा बैठकीत झाली. पवार म्हणाले, “बैठकीत झालेल्या चर्चेनुसार सध्या संसदेचे अधिवेशन चालू आहे. यावेळी फक्त पुणेच नव्हे तर रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या सर्व ठिकाणी सरसकट लसीकरणाचे धोरण स्वीकारण्याची मागणी केंद्राकडे करता येईल असे ठरले.” विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले की, अपवादात्मक स्थिती म्हणून पुण्याचा विचार करण्याची मागणी केंद्राकडे केली जाईल. लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे. फेब्रुवारीच्या सातपट म्हणजे २१० लसीकरण केंद्रे आता सुरू केली गेली आहेत. साधारण दिवसाकाठी २४ हजार जणांचे लसीकरण होते. ते वाढवण्याचा प्रयत्न आहे.
चौकट
‘जम्बो’ पुन्हा सुरू
“वाढत्या रुग्णसंख्येमुळे गृह विलगीकरणातील लोकांवर लक्ष ठेवणारी खास यंत्रणा सुरू केली जाणार आहे. कोरोना साथीच्या सुरुवातीच्या काळात केली तशी संस्थात्मक विलगीकरणाचीही सोय केली जाणार आहे. जम्बो रुग्णालयही पुन्हा सुरू करणार असून सोबतच खासगी रुग्णालयात देखील गरजेप्रमाणे कोरोना रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवल्या जातील.” - सौरभ राव, विभागीय आयुक्त