हडपसर : शहरात चौकाचौकात मोठमोठ्या रकमेच्या दहीहंडीचे फ्लेक्स झळकत आहेत. या फ्लेक्सवरील आकडे वाचून लोक आश्चर्यचकित होताना दिसत आहेत. मात्र मागील काही वर्षांचा अनुभव विचारला असता गोविंदा पथकाने हे आकडे फक्त जाहिरातबाजीसाठीच असतात, असे सांगितले.
जाहीर केलेल्या रकमेच्या फक्त २५ टक्केच रक्कम दिली जाते. सेलिब्रिटी व डीजेवर भरमसाठ खर्च करून ज्यांचे मुख्य आकर्षण त्या पथकांना फक्त मोठ्या रकमेची आशा लावली जाते. गोविंदांनो, गोकुळाष्टमीचे गोविंदा पथकांना वेध लागले आहेत. मात्र, दरवर्षी बक्षिसांची रक्कम भली मोठी असते. मात्र, अनेक मंडळांनी बक्षिसाची रक्कम गेल्या काही वर्षी तोकडीच दिली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून गोविंदांमध्ये नाराजी पसरली होती. गोकुळाष्टमी म्हटले दहीहंडी आणि ती फोडण्यासाठी गोविंदांची धामधूम असते. एकेकाळी उपनगर आणि परिसरामधील काही हजारांची दहीहंडी आता लाखांवर नव्हे, तर कोटी रुपयांवर गेली आहे. ही अभिमानाची बाब असली तरी, प्रत्यक्षात मात्र बक्षिसाची रक्कम मात्र तेवढी मिळत नसल्याची खंत अनेक गोविंदा पथकांनी व्यक्त केली आहे. गेल्यावर्षी अनेक मंडळांनी लाखो रुपयांची बक्षिसे देणार, अशी जोरदार जाहिरात केली. मात्र, प्रत्यक्षात अगदी काही हजार रुपयेच हातात टेकवले, त्यामुळे गोविंदाचा हिरमोड झाला.
गोविंदा रे गोपाळा, अशी आरोळी ठोकत दहीहंडी फोडण्यासाठी एकच गलका सुरू होतो आणि प्रेक्षकांची गर्दी जमते. गोविंदा थरावर थर रचत असताना, त्यांच्या अंगावर पाणी मारले जाते. त्यामुळे एखादा गोविंदा अंग चोरतो आणि थर ढासळतात. गोविंदा पथक दक्षता घेत असल्यामुळे मोठे अनर्थ टळतात. मात्र, त्यातूनही एखादी दुर्घटना दरवर्षी घडतेच. तरीही गोविंदामधील जोश, उत्साह काही कमी होत नाही.