पुणे : ‘लोकमत’ बाल विकास मंच व अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने व युनिसेफच्या सहकार्याने बालदिनानिमित्त आयोजित ‘आदर भविष्याचा’ (आॅनरिंग द फ्युचर) या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत सहज शिक्षण अजूनही पोहोचू शकत नाही, ही बाब प्रकर्षाने समोर आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षणासाठी झटणाºया लहान हातांचा गौरव करण्यात आला. ‘लोकमत’च्या उपक्रमाचे सर्वांनीच कौतुक केले. त्याचप्रमाणे बालकांच्या हक्कासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, अशी अपेक्षा उपस्थित वक्त्यांनी व्यक्त केली.‘आदर भविष्याचा’ या कार्यक्रमाचे उद्घाटन पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पुणे विभागाच्या सहायक शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत, युनिसेफच्या कम्युनिकेशन स्पेशालिस्ट स्वाती मोहपात्रा, अभिनेत्री सखी गोखले, अभिनेता सुव्रत जोशी आदी उपस्थित होते.डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, ‘‘लहान मुले माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारापासून वंचित राहत आहेत. त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचता येत नाही. मात्र, देशातील प्रत्येक मुलाला त्याचे अधिकार मिळावेत, यासाठी केवळ राजकीय व्यक्तीचीच नाही तर शैक्षणिक संस्था, प्रशासन, कलाकार यांच्यासह सर्व समाजाची एकत्रित जबाबदारी आहे. सर्वांनी एकत्र येऊन काम केले, तर हा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही.’’मीनाक्षी राऊत म्हणाल्या, ‘‘देशात ‘नाईन इज माईन’सारख्या काही स्वयंसेवी संस्था आहेत, की ज्या खºया अर्थाने मुलांच्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न करीत आहेत. शासनाने मुलांच्या विविध हक्कांसाठी काही शासन निर्णय काढण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्या अंमलबजावणीसाठी सर्वांनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमातून राज्यातील अनेक शाळांचा दर्जा सुधारला आहे. त्यामुळे खासगी शाळेतील विद्यार्थी पुन्हा सरकारी शाळेत प्रवेश घेऊ लागले आहेत.’’कार्यक्रमात नाईन इज माईन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेणाºया गुलाबशा खान, पूजा विश्वकर्मा, लक्ष्मी शर्मा, बाला शर्मा, सोनिया जयस्वाल या मुलींनी आपल्या अडचणी सांगितल्या. तर, बालविवाहाला विरोध करणाºया विद्या ठोके हिने ग्रामीण भगातही उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रोहन बांदेकर विद्यार्थ्यांनेही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात या सर्व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलचे संस्थापक एस. बी. अगरवाल, पुणे इंटरनॅशनल स्कूलच्या विश्वस्त रेणुका चलवादी, युआॅन ज्ञान अंकुर स्कूलच्या नीता पाटील, नारायण गेनबा मोझे स्कूलचे शिरीष सूर्यवंशी, धनेश्वर माध्यमिक विद्यालयाचे डी. व्ही. भाले या वेळी उपस्थित होते.आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने शिक्षण घेता येत नाही. शाळेत वेळेत शुल्क न भरल्याने शाळाने परीक्षेला बसू दिले नाही. घरात पालकांकडून मुलगा-मुलगी भेदभाव केला जातो. लहान भावंडांचा सांभाळ करावा लागत असल्यामुळे अभ्यासाला वेळ मिळत नाही. पैसे नसल्याने दोन वेळच्या जेवणाची चिंता असते त्यामुळे दहावी-बारावीनंतर घरीच बसावे लागेल, असे पालकांकडून सांगितले जाते, असे साश्रू नयनांनी नाईन इज माईन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अनुभव सांगून शिक्षण घेण्यात येणाºया समाजिक, कौटुंबिक व आर्थिक अडचणींवर प्रकाश टाकला. त्यामुळे केवळ कायदे करून उपयोग नाही, तर त्याच्या अंमलबजावणीत अडचणीच्या ठरणाºया गोंष्टींचाही विचार केला पाहिजे, असे मत उपस्थितांनी मांडले.देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नातील ९ टक्के हिस्सा हा मुलांच्या शिक्षणावर खर्च झालाच पाहिजे; तरच या मुलांना वर्तमानात चांगले शिक्षण घेता येईल. त्यातूनच त्यांचे भविष्य घडणार आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन व केंद्र शासनाने ९ टक्के रक्कम मुलांच्या शिक्षणावर प्रामाणिकपणे खर्च केली. तरच, देशातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्लब घटकातील मुले या आर्थिक महासत्तेचा भाग होऊ शकतील.- डॉ. सिद्धार्थ धेंडे,उपमहापौर, पुणे महापालिकादेशातील अनेक विद्यार्थ्यांना आजही दर्जेदार शिक्षण घेता येत नाही. कौटुंबिक व आर्थिक कारणांमुळे मुलींना इच्छा नसताना शिक्षण सोडावे लागते. मात्र, प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे ध्येय प्राप्त करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे सर्व प्रकारची मदत केली जाईल. गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल.- डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील, कुलपती, अजिंक्य डी. वाय.पाटील विद्यापीठ
बालकांच्या हक्कांसाठी सर्वांनी एकत्र यावे, लोकमत, युनिसेफ आणि अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 1:28 AM