दरवर्षी २९ एप्रिल हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस’ म्हणून साजरा केला जातो. बॅले नृत्याचे आद्य संस्थापक जीन-जॉर्जेस नोव्हेर यांचा हा जन्मदिवस. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जावा, असे इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूशनने ठरविल्यानंतर हा दिवस भारतामध्येही साजरा केला जाऊ लागला. नृत्य कलेला आणि नृत्य कलावंताला जगमान्यता मिळावी, या कलेचा अधिकाधिक प्रसार व्हावा आणि तिला राजाश्रय मिळावा, हा या ‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस’ साजरा करण्यामागचा उद्देश आहे. शास्त्रीय नृत्य ही भारताची अभिजात परंपरा मानली जाते. मात्र, कालपरत्वे पाश्चिमात्य नृत्यप्रकारांनीही देशात शिरकाव केल्याने सालसा, बॅले, हिप हॉप, झुंबासारख्या नृत्याकडे सर्वांचाच ओढा वाढत चालला आहे. त्याचा जागतिक नृत्यदिनानिमित्त घेतलेला हा आढावा.प्रत्येकाच्या अंगात ताल असतो. नृत्य शिकणे किंवा न शिकणे हा वेगळा भाग असून ज्याला हृदयात बीट आहे त्याला तो गाण्यात पकडता येतोच. इतकेच नव्हे तर फक्त व्हायब्रेशनच्या मदतीने कर्णबधिरही उत्तम नृत्य करतात. माझ्यासाठी तर नृत्य श्वासाइतके महत्त्वाचे असल्याचे मत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले. सोनाली म्हणाली, ‘‘सध्या मी एरियल सिल्क, बेलीडान्स शिकत आहे. हे शिक्षण कधीही संपणारे नसून हा प्रवास आयुष्यभर सुरू राहणार आहे. सध्या, रियालिटी शोचे प्रमाण खूपच वाढले आहेत. पालकांनी मुलांना नक्की काय आवडते, हे बघण्याची गरज आहे. त्यातून त्यांचं बालपण तर हरवणार नाही ना याचाही विचार होणं गरजेचे आहे. स्पर्धा म्हटलं की हार-जीत ही असतेच पण त्या कलाकाराला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध असते. त्यातून मोठमोठ्या नृत्य दिग्दर्शकांकडून नृत्य प्रकार शिकायला मिळतात, ओळख मिळते ही सकारात्मक बाजू लक्षात घेण्याची गरज आहे. नृत्यदिनाच्या निमित्ताने नक्की सांगेन की, स्वत:साठी नक्की नाचा. त्यातून मिळणारी ऊर्जा नक्कीच कायम टिकणारी असते. शब्द समजून घ्या, शब्दांचा अर्थ समजून घ्या, असं केलं तर तुम्हाला कधीही नैराश्य येणार नाही. स्वत:साठी नक्की नाचा आणि आयुष्य एन्जॉय करा.ज्या ‘अप्सरा आली’ लावणीमुळे मी घराघरांत पोहोचले ती करतानाही तितकी शास्त्रीय लावणी लोकांना आवडेल की नाही याबाबत आम्हाला शंका होती. त्यावेळी अप्सरा दाखवताना तिचे अप्सरा असतानाचे कपडे, मुकुट आम्ही ठेवला होता. त्यात फार वेगळ्या प्रकारे फुलवा खामकरने नृत्यदिग्दर्शन केले होते आणि त्या गाण्याने घडवलेला इतिहास तर सर्वांना माहिती आहे. त्यामुळे कदाचित विविध रस तितक्याच नजाकतीने पेश करणारी लावणी मला सर्वाधिक भुरळ घालते. पण त्याव्यतिरिक्त मी नवनवीन नृत्यप्रकार शिकत असते.- सोनाली कुलकर्णी,अभिनेत्री
प्रत्येकाच्या आंगात ताल - सोनाली कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 4:01 AM