लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ब्रिटनमध्ये नव्या स्वरुपातील कोरोना विषाणू आढळला आहे. याचा प्रसार अधिक वेगाने होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने केंद्राने या संदर्भात मार्गदर्शक सूचना काढली आहे. त्यानुसार पुणे विभागातील पाचही जिल्ह्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत ब्रिटनहून आलेल्या प्रत्येक प्रवाशाचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
या संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली आहे. येत्या शुक्रवार (दि. २५) पासून हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. दरम्यान जे कुणी २५ नोव्हेंबर २०२० नंतर ब्रिटनहून आले असेल त्यांनी स्वतःहून आरोग्य विभागाशी संपर्क साधून या सर्वेक्षणात सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
विमानतळ आरोग्य अधिकाऱ्यांकडून २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात ब्रिटनहून मुंबईत उतरलेल्या प्रवाशांची यादी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे. या यादीनुसार ज्या प्रवाशांना भारतात येऊन २८ दिवसांपेक्षा अधिक कालावधी झालेला आहे ते प्रवासी वगळून इतर प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीत बाधित आढळलेल्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेत (‘एनआयव्ही’त) पाठविले जाणार असल्याचे विभागीय आरोग्य उपसंचालक डाॅ. संजय देशमुख यांनी सांगितले.
चौकट
पुण्यातील ८७ प्रवासी ‘क्वारंटाईन’
“पुण्यात गुरूवारी (दि. २४) दुबईहून एक फ्लाईट आली असून या फ्लाईट मधील सर्व ८७ प्रवाशांना हाॅटेलमध्ये ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. यातल्या लक्षणे दिसणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. तसेच गेल्या २८ दिवसांत परदेश दौऱ्यावरुन आलेल्या सर्व प्रवाशांचा देखील शोध घेण्यात येणार आहे.”
- डाॅ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे