पुणे : महापालिकेच्या निवडणुकांसाठी ४ वॉर्डांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. यामुळे पुणे महापालिकेच्या प्रस्तावित ३८ प्रभागांमध्ये प्रत्येकी १ जागा खुल्या गटासाठी तर १ जागा महिलेसाठी राहणार असून, उर्वरित दोन जागा आरक्षित असतील. त्यामुळे खुल्या गटातील प्रत्येकाला प्रभागातून निवडणूक लढविण्याची संधी प्राप्त होणार आहे. वॉर्डात आरक्षण पडल्यामुळे निवडणुकीपासून वंचित राहावे लागण्याच्या धोक्यापासून नगरसेवक व इच्छुकांची सुटका होणार आहे. राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका दोन वॉर्डांचा प्रभाग यापद्धतीने घेण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या महापालिकांच्या निवडणुका ४ वार्डांचा एक प्रभाग यापध्दतीने घेण्याचा निर्णयही अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्यालाही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी पालिकेच्या निवडणुका २ वॉर्डांचा एक प्रभाग याप्रमाणे घेण्याचे जवळपास निश्चित झाले होते. मात्र याला भाजपामधून मोठा विरोध झाला. चारच्या प्रभागानुसार निवडणुका होणे भाजपाला जास्त फायदेशीर ठरणार असल्याने तोच निर्णय घेण्यात यावा याकरिता जोरदार फिल्डिंग लावण्यात आली. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँगे्रस या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे मन वळविण्यातही भाजपाच्या नेत्यांना यश आले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ४च्या प्रभागाची घोषणा होण्याची शक्यता आहे.बीपीएमसी अॅक्टनुसार २५ लाख लोकसंख्येसाठी १२५ नगरसेवक आणि त्यापुढील प्रत्येक लाखास १ नगरसेवक घेण्यात यावेत अशी तरतूद आहे. पुणे शहराची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ३१ लाख ३२ इतकी आहे. त्यामुळे महापालिकेतील नगरसेवकांची संख्या १५२ इतकीच राहील. राज्य शासनाने ४च्या प्रभागानुसार निवडणुका घेण्याचा निर्णय घेतल्यास पुणे महापालिकेमध्ये ४ वॉर्डांचा एक प्रभाग असे एकूण ३८ प्रभाग होतील. माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी याबाबत सांगितले, ‘‘शहरात एकूण ३८ प्रभाग होतील त्यामध्ये ओबीसीसाठी २७ टक्के म्हणजे ४२ जागा राखीव राहतील. त्यानुसार ओबीसीचे २१ पुरुष व २१ महिलांसाठी प्रभाग आरक्षित राहतील. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी २२ टक्के म्हणजे ३३ जागा आरक्षित राहतील. त्यामध्ये १६ पुरुष व १६ महिलांसाठी आरक्षण राहिल. सर्वसाधारण जागा ७६ राहतील. त्यामध्ये ३८ महिला व ३८ पुरुष यांना निवडणुका लढविता येईल.’’
चार प्रभागांमुळे सर्वांना निवडणूक लढण्याची संधी
By admin | Published: May 11, 2016 1:14 AM