पुणे : मानवाच्या विकासविषयक चुकीच्या कल्पनांमुळे पृथ्वीवरील परिसंस्था धोक्यात आल्या आहेत, पर्यावरण परिसंस्था जपण्याची जबाबदारी सर्वांची असून पृथ्वीवरील प्रत्येकाने त्यात योगदान दिले पाहिजे, असा सूर ‘तेर पॉलिसी सेंटर' आयोजित 'परिसंस्थेची पुनर्रचना ' या वेबिनारमध्ये उमटला.
'तेर पॉलिसी सेंटर'च्या वतीने 'परिसंस्थेची पुनर्रचना' या विषयावर जागतिक पर्यावरण दिवसाच्या पूर्वसंध्येला परिसंवादाचे आयोजन केले होते.
'एमआयटी-डब्ल्यूपीयू' चे संशोधक डॉ. पंकज कोपर्डे, 'फॅमिली हेल्थ इंटरनॅशनल'च्या सल्लागार शादी जहान बिन, 'ओशन गव्हर्नन्स लिमिटेड'चे संचालक सुनील मुरलीधर शास्त्री, डॉ. कलाम संशोधन शिष्यवृत्तीप्राप्त पर्यावरणप्रेमी मंजींदर कौर यांनी या वेबिनारमध्ये मार्गदर्शन केले.
तेर पॉलिसी सेंटर'चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेंडे यांच्यासह अनेक मान्यवर या परिसंवादात सहभागी झाले.
'तेर पॉलिसी सेंटर' च्या संस्थापक संचालक डॉ. विनिता आपटे यांनी प्रास्ताविक केले. डॉ पंकज कोपर्डे म्हणाले, 'परिसंस्थेची पुनर्रचना ही मोठी आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे. या विषयाच्या अमलात आलेल्या चांगल्या संकल्पना अभ्यासल्या पाहिजेत. त्यात नागरिकांचा सहभाग ही महत्त्वाची गोष्ट असणार आहे.
'फॅमिली हेल्थ इंटरनॅशनल'च्या सल्लागार शादी जहान बिन म्हणाल्या, 'परिसंस्थेची आणि पर्यावरणाची काळजी करताना इको -फेमिनिझम ' संकल्पनेवर भर दिला पाहिजे.
'ओशन गव्हर्नन्स लिमिटेड'चे संचालक सुनील मुरलीधर शास्त्री म्हणाले, ‘प्रदूषणामुळे समुद्रातील परिसंस्था नष्ट होत आहेत, त्याचा पृथ्वीवर परिणाम होत आहे. अजून परिस्थिती हाताबाहेर गेली नाही, तोपर्यंत आपण प्रयत्न वाढवले पाहिजेत.’
डॉ कलाम संशोधन शिष्यवृत्तीप्राप्त पर्यावरणप्रेमी मंजींदर कौर म्हणाल्या, 'पर्यावरणाची काळजी घेण्यामध्ये युवा पिढीचा मोठा सहभाग आवश्यक आहे. ऊर्जेचा कमी वापर, प्लास्टिक निर्मूलन, पाण्याची उधळपट्टी टाळणे, पर्यावरणपूरक गोष्टींचा प्रसार यामध्ये युवा पिढी मोठे योगदान देऊ शकते.
डॉ राजेंद्र शेंडे म्हणाले, ‘पृथ्वीवरील परिसंस्था जपण्यासाठी मानवाने निर्मित केलेल्या व्यवस्था आधी जपल्या पाहिजेत. भारतात पृथ्वीला माता समजले जाते. इतर कोणत्याही देशात पृथ्वीला माता समजले जात नाही. त्या दृष्टीने इको-फेमिनिझमला आपण सुरुवात केली आहेच, त्यामुळे भारतीय म्हणून आपली जबाबदारी अधिक आहे.'