पुणे : माणसाला समाजकार्य, मदत करण्यासाठी पैसा अथवा संस्थेची गरज भासते. असं खोडून टाकणारं एकमेव उदाहरण पुणे मुंबई हायवेवर पाहायला मिळालं आहे. पाणी माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. एखाद्याची तहान भागवण्यारखे पूण्य कुठंही मिळत नाही. अशीच माणुसकी दाखवणारी गोष्ट पुणे मुंबई महामार्गावर पाहायला मिळाली. हायवेवर एक टँकर पलटी झाल्याने प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. त्यावेळी त्याठिकाणी उन्हातान्हात अडकलेल्या माणसांची तहान भागवणारा माणसातला देवमाणूस आधार बनल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले आहे. त्याबद्दल पुण्यातील गौरी नावाच्या युवतीने फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे.
पुणे मुंबई हायवेवर २६ मार्चला सकाळी केमिकलचा टँकर पलटी झाल्याने हायवेवर पूर्ण वाहतूक कोंडी झाली होती. तेव्हा गौरी या पुण्याहुन मुंबईकडे निघाल्या होत्या. तब्बल तीन तास ट्राफिक मध्ये अडकून राहिल्याने त्यांची पुण्याला परत जाण्याची इच्छा झाली होती. परंतु त्यावेळी गौरी यांना सिद्धेश गायकवाड नावाचा युवक दिसला. तो त्यांच्यासमोर अर्धा लिटर पाण्याची बाटली घेऊन आला. आणि त्याने पाणी पाहिजे का? असं विचारलं... गौरी यांनी हो म्हणून बाटली घेतली आणि किती देऊ विचारले. तर त्याने सांगितलं मी सगळ्यांना पाणी वाटत आहे पैसे नको आहेत मला असं तो यावेळी म्हणाला. चार पाच तास झाले आहेत. सगळे एकाच जागी अडकून पडले आहेत. म्हणून मी फ्री पाणी देत आहे सगळ्यांना..., असे त्याने गौरी यांना सांगितले.
उन्हाळा वाढला आहे, लहान मुलं असतात सोबत घेतलेलं पाणी पण एवढ्या वेळात गरम होऊन गेलं असेल या सगळ्याचा विचार करून छोटासा सिद्धेश गायकवाड आणि त्याची बहीण असे दोघे जण हायवे वर अडकलेल्या सगळ्यांना पाण्याच्या बाटल्या वाटत होता.
सिद्धेशला ओळखणारे असतील तर त्याला नक्की कळवा - गौरी
तेव्हा गौरी यांनी त्याला विचारलं 'एक फोटो घेऊ का रे तुझा तर नको कशाला उगीच ताई एवढंच म्हणाला. मग थोड्या गप्पा मारल्या नंतर तयार झाला. व त्यांनी सिद्धेश बरोबर एक फोटोही घेतला. फेसबुक वर नाहीये हा दादा.. पण लोणावळा, पांगोळी चे कोणी त्याला ओळखणारे असतील तर नक्की त्याला कळवा व्हायरल करा असे गौरी यांनी सांगून सिद्धेश गायकवाडचे आभार मानले. पैसे देऊन पण पाणी मिळेल असं दुकान सुध्दा आजूबाजूला नसताना बसल्या जागी मिळालेलं पाणी म्हणजे अमृत च वाटलं त्या वेळेला अशा वेळी या जगात चांगली माणसं आहेत याचा प्रत्यय येतो असाही त्यांनी सांगितलं आहे.