बारामतीची प्रतिष्ठा कोणी वाढवली, हे सगळ्यांना माहितीये; शरद पवारांचे अजित पवारांना प्रत्युत्तर
By राजू हिंगे | Published: February 11, 2024 04:04 PM2024-02-11T16:04:33+5:302024-02-11T16:04:59+5:30
पुण्याचा आणि महाराष्ट्राचा नागरिक हा सुज्ञ असून या झुंडशाहीला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.
पुणे : मी काही निवडणुकीला उभा राहणार नाही, हे मी यापूर्वी जाहीर केले आहे. त्यामुळे बारामतीमध्ये भावनिक आवाहन करण्याचे कारण नाही. बारामतीचे लोक शहाणे आणि समंजस आहेत. वर्षानुवर्षे कोणी काम केले आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली, हे बारामतीकरांनी पाहिले आहे. ते योग्य निर्णय घेतील, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉक्टर सेलच्या मेळाव्यात आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर ते पत्रकाराशी बोलत होते.
शरद पवार म्हणाले, माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की, बैलजोडीवर मी पहिली निवडणुकीवर लढलो. आमचं दोन वेळा चिन्ह गेलेलं आहे, चिन्ह मर्यादीत काळासाठी उपयुक्त असतं, असं सांगतानाच निवडणूक आयोगाचा निकाल आश्चर्यकारक आहे. निवडणूक आयोगाने आमचं पक्षाचं नावं आणि चिन्ह काढून घेतलं. आमचा पक्ष दुसऱ्यांना दिला. ज्यांनी पक्ष स्थापन केला, पक्षाची उभारणी केली, त्यांच्या हातातून पक्ष काढून घेऊन दुसऱ्यांना दिला, असं देशात याआधी घडलेलं नव्हतं. पण, ते ही निवडणूक आयोगाने करून दाखवलं. जनता या सर्व गोष्टींना समर्थन देणार नाही. सुप्रीम कोर्ट याबाबत योग्य तो निकाल देईल. पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवरती ज्या पद्धतीने हल्ला करण्यात आला ह्या हल्ला याचा अर्थ स्पष्ट आहे. की आजचे राज्यकर्ते हे झुंडशाहीच्या मार्गाने जाऊ इच्छितात मात्र ही झुंडशाही लोक कदापि पटणार नाही. पुण्याचा आणि महाराष्ट्राचा नागरिक हा सुज्ञ असून अशा प्रवृत्तीला त्याची जागा दाखवल्याशिवाय तो राहणार नाही. ही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे. ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं त्या पक्षाच्या राज्य आणि देश पातळीच्या नेत्यांनी गंभीर दखल घेण्याची आवश्यकता होती ती घेतली नाही ही चिंताजनक बाब आहे, असे पवार यांनी सांगितले.
चिन्हाबाबतचा प्रस्ताव पाठविणार
राष्ट्रवादी काँग्रेस वटवृक्ष याच चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे करणार आहे या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, अद्याप आणि चिन्ह बाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. निवडणूक आयोगाने चिन्ह कळवण्याबाबत आम्हाला पत्र पाठवला आहे. आम्ही सोमवार किंवा मंगळवारी त्यांची वेळ घेऊ आणि प्रस्ताव देऊ. तत्पूर्वी सर्व सारखा सहकाऱ्यांशी चर्चा करून चिन्हाबाबत निर्णय घेणार आहे.