बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फटकारल्याने नाराज असणारे पार्थ पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी शनिवारी कन्हेरी (ता. बारामती) येथे श्रीनिवास पवार यांच्या ‘अनंतारा’ निवासस्थानी बैठक झाली असून पार्थ यांची समजूत घालण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, पार्थ यांच्या काकू शर्मिला पवार यांनी ‘तसे काही नाही, आमच्यात सगळं व्यवस्थित आहे,’ अशी सूचक प्रतिक्रिया ‘लोकमत’ला दिली.पार्थ पवार शनिवारी त्यांचे काका श्रीनिवास यांच्या निवासस्थानी साडेतीन वाजता आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार येणार नसल्याची माहिती मिळाली होती. मात्र, सायंकाळी साडेसात वाजता उपमुख्यमंत्री पवार या ठिकाणी पोहोचले. पिता-पुत्र दोघेही रविवारी सायंकाळपर्यंत बारामतीतच होते. ज्येष्ठ नेते पवार रविवारी दुपारी पुणे शहरातील मोदी बाग येथील निवासस्थानी पोहचले होते. त्यानंतर ते सायंकाळी बारामतीला पोहचणार होते. पार्थ ‘साहेबां’ची भेट घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र,खा.पवार यांचा बारामती दौरा अचानक रद्द झाला....मला माझे काम करु द्या !पार्थ प्रकरणी पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता, ‘मला माझे काम करु द्या’, एवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली.>रोहित पवार म्हणाले, धार्मिक स्थळे सुरू कराजामखेड : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील मंदिर आणि धार्मिकस्थळे उघडी करण्याची मागणी टिष्ट्वटरवरून केली आहे. राज्य सरकारने पर्युषण पर्व काळात मंदिरे खुली करता येणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र नुकतेच न्यायालयात दाखल केले आहे. याचवेळी मंदिर खुले करण्याची मागणी पवार यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त के ले जात आहे. राम मंदिराला शुभेच्छा देण्यावरून पार्थ पवार सध्या चर्चेत आहेत. रोहित पवार यांनी मंदिर सुरू करण्याची मागणी केल्याने आता सरकारलाही त्यांचे वक्तव्य अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.
आमच्यात सगळं काही व्यवस्थित!, शर्मिला पवार यांची सूचक प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 3:10 AM