Jayant Patil: सत्ता जाण्याची शक्यता असल्याने त्यांच्यासाठी सर्व काही लाडके होऊ शकते - जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 04:17 PM2024-08-12T16:17:45+5:302024-08-12T16:18:19+5:30
लोकसभेच्या निकालावरून लक्षात आले आहे की, सत्ता जाण्याची शक्यता आहे
बारामती: लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी तुम्ही चंद्र जरी मागितला तरी ते देण्याच्या तयारीत आहेत. असं म्हणत लाडक्या खुर्चीसाठी पडेल ते म्हणाल ते करायला तयार आहेत. कारण त्यांना लोकसभेच्या निकालावरून लक्षात आले आहे की, सत्ता जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सर्व काही लाडके होऊ शकते. असं म्हणत जयंत पाटलांनी (Jayant Patil) राज्य सरकारवर टीका केली आहे. शरदचंद्र पवार पक्षातर्फे आयोजित शिवस्वराज्य यात्रेच्या महावीर भवन येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
पाटील म्हणाले, पवार साहेबांच्या एकदा डोक्यात बसलं की मग काय खरं नाही. त्यांच्याकडे जिद्द एवढी प्रचंड आहे की, वयाचा अडसर त्यांच्यासमोर येत नाही. त्यांनी एकदा मनात घेतलं की, तर ते पाट लावूनच सोडतात. त्यामुळे शहाण्या माणसाने त्यांना डिवचू नये, एकदा जागं केलं,आणि आव्हान दिल की पवार साहेब ते तडीस नेतात. असा ८४ वर्षांचा योद्धा तुम्ही सर्वांनी हाताच्या फोडासारखा जपला. त्यामुळे तुम्हा बारामतीकरांचे महाराष्ट्रावर लाख मोलाचे उपकार आहेत.
भारतीय जनता पक्षामध्ये राम राहिला नाही
महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे काम तुम्ही निवडून दिलेले महाविकास आघाडीचे शिलेदार करत आहेत. आज भारतीय जनता पक्षामध्ये राम राहिला नाही. तो राम पार्टी सोडून गेला आहे. जिथे जिथे रामाची देवळे आहेत. तिथे तिथे भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे नीतिमत्तेने वागले तर देव राहतो. मात्र अनितीचा पाठपुरावा सुरू केला. भ्रष्ट मार्गाने पुढे जायचा प्रयत्न केला. ती नीती तुम्हाला माफ करत नाही, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले, बारामतीकरांनी लोकसभेला दाखवून दिले आहे. काही योजनांचा पोहा पोहा...सुरू आहे. या योजनांची 'फोड' बारामतीकरांसारखी कोणीही करू शकत नाही. नऊ वर्ष भाऊ रोज दारावरून जातो कधीच वळत नाही आणि अचानक भाऊ दारात आला आणि म्हणाला रक्षाबंधन करतो ओवाळणी घाल. भावाने सांगावं बहिणीने काय करावे. इतके वर्ष आठवण झाली नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी बहीण लाडकी नव्हती. निवडणुकीनंतर ही जर परिस्थिती येत असेल तर काय डोळ्यासमोर ठेवून कोण निर्णय घेते हे पाहिलं पाहिजे. काहीजण म्हणतात की, विकासासाठी लोक जातात. हे आपण अनेकदा ऐकतो. आम्हाला एक कायम दरारातील आवाज ऐकायची सवय होती. वाघाच्या आवाजाचं म्याव म्याव झालं की काय...कळेना झालेय, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी नाव न घेता अजित पवार यांना टोला लगावला.