पुणे : शनिवारवाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनासाठी माअाेवाद्यांचा पैसा वापरला गेला अाहे. मात्र कोरेगाव भीमाच्या हिंसाचाराला एल्गार परिषद जबाबदार आहे याबाबत कुठलेही पुरावे नाहीत. असा खुलासा पुण्याचे माजी पाेलिस सहअायुक्त रविंद्र कदम यांनी केला.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने रविंद्र कदम यांचा ‘शहरी नक्षलवाद’ याविषयावर संवाद आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील आणि सरचिटणीस पांडुरंग सांडभोर उपस्थित होते. पुण्यात 31 डिसेंबर राेजी अायाेजित केलेल्या एल्गार परिषदेला माअाेवादी संघटनांनी पैसै पुरवला असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. परंतु एल्गार परिषदेच्या मंचावरील प्रत्येकाचा माअाेवाद्यांशी संबंध असल्याचा कुठलाही पुरावा नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कदम म्हणाले, एल्गार परिषदेच्या अायाेजनात अनेक अॅंटी फॅसिस्ट फ्रंडच्या संघटनांचा सहभाग हाेता. या परिषदेला माअाेवाद्यानींच पैसा पुरविला होता. या परिषदेच्या माध्यमातून माअाेवाद्यांनी शहरात नेटवर्क निर्माण केले असून, बुद्धधीवंत आणि उच्चशिक्षित तरूणांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. माअाेवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन लेखक सुधीर ढवळे व इतरांना अटक केल्यानंतर तपासामध्ये त्यांचे लँपटॉप, हार्डडिस्क जप्त करण्यात आली. पाेलिसांना जवळपास २५० पत्र पोलिसांना मिळाली आहेत. यामधून कुणी कसा पैसा या एल्गार परिषदेला पाठविला, याचे काही पुरावे मिळाले आहेत. या परिषदेच्या माध्यमातूनच भीमा कोरेगावचे संघटन करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यामध्ये झालेल्या दंगलीशी एल्गार परिषदेचा काही संबंध होता का? असे तपासातून समोर आले नसल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.
दुर्गम भागाप्रमाणेच शहरातही उपेक्षित घटक आहे, त्यांच्यामध्येही असंतोषाची ठिणगी पेटली आहे. याच असंतोषाला क्रांतीमधून प्रेरित करण्याचा प्रयत्न माअाेवाद्यांकडून केला जात आहे. राज्यात पाळमुळ रूजविण्यासाठी शहरातील माअाेवादीकेंद्र उपयोगी पडतील यासाठी २००७ नंतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर माअाेवादी कारवाया सुरू झाल्या. विद्यार्थी आणि बरोजगारांवर लक्ष्य केंद्रित केले जात आहे. सशस्त्र क्रांतीमधून सत्ता प्रस्थापित करणे हे माअाेवाद्यांचे ध्येय आहे. माअाेवाद्यांच्या युनायटेड फ्रंटमध्येच अँटी फँसिस्ट फ्रंटचा ठराव करण्यात आला. त्याच फ्रंटच्या माध्यमातून पुण्यात एल्गार परिषद भरविण्यात आली. हिंसेची अपरिहार्यता निश्चित ध्येयापर्यंत पोहोचून देऊ शकत नाही, ही माअाेवाद्यांची मानसिकता आहे, त्यामुळे त्यांच्याकडून हिंसेचे समर्थन केले जात आहे. मात्र हिंसेच्या वापरातून प्रतिहिंसा तयार होते. हिंसेचे एक विषारी वर्तुळ आजूबाजूला निर्मित होते. त्यातून रक्त सांडते पण अंतिम ध्येय गाठणे शक्य होत नाही. हिंसेतून निर्माण झालेला बदल हा कायमस्वरूपी टिकू शकत नाही, याकडेही कदम यांनी लक्ष वेधले.