पुणे: सावकारीसह विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या नानासाहेब गायकवाड यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. त्यांच्या सावकारी व बेहिशोबी मालमत्तेचे पुरावे त्यांच्या मुलीने नष्ट केल्याचे समोर आले असून, यात तिला भाऊ आणि आईची मदत झाली आहे. तसेच अनेक कागदपत्रे फाईल्समधून काढून घेतली आहेत, तर काही कागदपत्रे अनोळखी ठिकाणी लपवून ठेवल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले.
लोकांना बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत सावकारी केल्याप्रकरणी अटकेत असलेले नानासाहेब ऊर्फ भाऊ शंकरराव गायकवाड (वय ७०), नंदा नानासाहेब गायकवाड (वय ६५) आणि गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड (सर्व रा. औंध) यांच्या पोलीस कोठडीत ८ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. विशेष मोक्का न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला.
या गुन्ह्यातील कागदोपत्री आणि तांत्रिक पुरावा आरोपींनी निष्पन्न साथीदारांच्या मदतीने लपवून ठेवला असल्याचे समोर आले आहे. आरोपी दांगट याने या गुन्ह्यातील बेहिशोबी मालमत्तेबाबत माहिती दिली आहे. कागदपत्रांची बॅग लपवून ठेवलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी यापूर्वी केलेल्या गायकवाडच्या घरझडतीमधून ईएसए मॉडेल २०० एअर रायफल, ३१ जिवंत काडतुसे असलेले ३२ कॅलिबरचे दोन बॉक्स, नोटा मोजण्याचे दोन मशिन आणि नानासाहेब गायकवाड, संजीव मोरे व इतर ७० लोकांकडून घेतलेले विना सह्यांचे खरेदीखत औंध येथील गायकवाड कुटुंबीयांच्या घरात मिळून आले आहे. तसेच पोलिसांना दोन पानी कागद मिळाला असून, त्यावर १४ लोकांची नावे आहेत. नावांच्या पुढे त्यांना कर्जाने दिलेली रक्कम लिहिण्यात आली आहे. गायकवाड त्यांच्या घरातील सीसीटीव्हीचे संच बंद असून, उपलब्ध असलेल्या डीव्हीआर तसेच तेथील इतर इलेक्ट्रॉनिक साधनांमध्ये छेडछाड केल्याचे दिसून आले. मूळ फिर्र्यादीतर्फे अॅड. पुष्कर दुर्गे, अॅड. सचिन झालटे, अॅड. ऋषिकेश धुमाळ यांनी कामकाज पाहिले. सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
----------------------------------------