पुणे/सासवड: सासवडमधील तहसीलदार कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रात्यक्षिक ईव्हीएम यंत्रे चोरून नेल्याच्या घटनेची केंद्रीय निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी यांना निलंबित करण्याचे मुख्य सचिवांनी दिले आहेत. तसेच या प्रकरणाचा अहवाल १२ फेब्रुवारी दुपारी ३ पर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाला अहवाल सादर करण्यासही सांगितले आहे.
रविवारी सुट्टी असल्याने तहसील कार्यालय बंद होते. सहायक फौजदार डी. एल. माने आणि होमगार्ड जवान राहुल जरांडे त्यावेळी कर्तव्यावर होते. सोमवारी नेहमीप्रमाणे सकाळी नियमित कामकाजासाठी सर्व कर्मचारी आले असता तहसील कार्यालयामधील ईव्हीएम मशिन ठेवलेल्या स्ट्रॉँग रूमचा दरवाजा उघडा असलेला दिसून आला. त्यामुळे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी तातडीने पाहणी करून प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांना याबाबत कळविले. तसेच पोलिस निरीक्षक संतोष जाधव, भोर उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांना माहिती दिल्यानंतर लगेचच घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. त्यामध्ये मतदान करण्याच्या डेमो (प्रात्यक्षिक) मशिनसह काही कागदपत्रांची चोरी झाल्याचे उघड झाले. त्यानंतर सहायक फौजदार डी. एल. माने आणि होमगार्ड जवान राहुल जरांडे यांना मंगळवारी निलंबित केले होते. मात्र, या प्रकरणात केंद्रीय निवडणूक आयोगाने थेट लक्ष देत पुरंदर प्रांताधिकारी- वर्षा लांडगे -खत्री, तहसीलदार- विक्रम रजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी- तानाजी बर्डे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनीही याप्रकरणाचा १२ फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
दोन संशयीत ताब्यात
पुरंदर तहसील कार्यालयातील प्रात्यक्षिक ईव्हीएम यंत्रे अज्ञातांनी चोरली. याचे संपूर्ण चित्रीकरण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले आहे. त्या चित्रीकरणात तीन चोरटे आढळून आले असून त्यातील दोन संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी गुप्तपणे याचा तपास सुरु केला आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडे चौकशी सुरु होती. त्यांनी ही यंत्रे का चोरही हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.