पुणे : अल्पवयीन चार मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी माजी आयपीएस अधिकारी मारुती सावंत याला पाच वर्षे कारावास आणि सात लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ (अ) नुसार सावंत याला न्यायालयाने दोषी ठरविले. दंड न भरल्यास पंधरा महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही निकालपत्रात नमूद केले आहे. विशेष न्यायाधीश श्रीप्रदा पोंक्षे यांनी हा निकाल दिला.
अधिक माहितीनुसार, शाळेत मुलींच्या समुपदेशनातून वरील प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात मार्च २०१५ मध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार व तीन मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणात मारुती सावंत (रा. हिंगणे खुर्द) याच्यावर बलात्कार, विनयभंग, बालकांचे संरक्षण कायदा (पॉस्को), अनुसूचित जाती -जमातींवरील अन्याय- अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॅसिटी) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (आयटी) आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याकाळी कृषी खात्यात वरिष्ठ अधिकारी असलेल्या मारुती सावंत यांच्यावर सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सरकारने सावंत यांना निलंबित केले होते. या गुन्ह्याचा तपास स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद मोहिते व पोलीस हवालदार राजेंद्र गिरमे यांनी केला. आरोपीविरोधात विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यापैकी बलात्कार, धमकावणे, पॉक्सो आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा सिद्ध न झाल्याने आरोपीला निर्दोष सोडले हाेते. मात्र, माहिती तंत्रज्ञानाच्या कलमानुसार आरोपीला शिक्षा सुनावली आहे.
याप्रकरणी सरकारतर्फे वकील प्रताप परदेशी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ॲड. परदेशी यांनी या प्रकरणात एकूण १४ साक्षीदार तपासले. आरोपीने अल्पवयीन मुलींना दाखविलेल्या ब्ल्यू फिल्म्सचा गुन्हा ग्राह्य धरून आयटी कलमानुसार आरोपीला दोषी ठरविण्यात आले.