सासवड (पुणे) : येथील शिवतीर्थावर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरू आहे. राजकीय नेत्यांना गावबंदी तसेच आंदोलन स्थळी येऊ नये असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. सोमवारी आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी आलेल्या माजी आमदार अशोक टेकवडे व भाजपचे नेते जालिंदर कामठे यांना आक्रमक मराठा आंदोलकांनी धक्काबुक्की करत हुसकावून लावले. तर गुणरत्न सदावर्ते, नारायण राणे व रामदास कदम यांच्या फोटोला जोडे मारून त्या फोटोंचे दहन करण्यात आले. यावेळी आग आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांची मोठी धावपळ झाली.
सकल मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून ५० मध्येच मराठा कुणबी म्हणून आरक्षण मिळावे आणि मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून पुरंदर तालुक्यातील सकल मराठा क्रांती मोर्चाकडून सलग पाचव्या दिवशी आंदोलन सुरूच ठेवले. दरम्यान, सुपे ग्रामस्थांनी सासवड येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास वंदन करून बैलगाड्या रस्त्यावर सोडून रास्ता रोको आंदोलन करत दिवसभर उपोषण केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पुणे - पंढरपूर मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. सुमारे दोन तासांनंतर वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले.
आंदोलनाची तीव्रता पुरंदर तालुक्यातील प्रत्येक गावात पोहोचली असून गावोगावी रास्ता रोको, सरकारचा निषेध आंदोलन सुरू झाली आहेत. अनेक गावात राजकीय नेत्यांना गावबंदीचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. आंदोलन स्थळी सासवड बार असोसिएशनच्या वतीने आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला. यापूर्वीही सासवडच्या शिवतीर्थावर मराठा आरक्षणासाठी पुरंदर तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून सलग १०० दिवस ठिय्या आंदोलन करून मराठा आरक्षण मागणीची ज्योत तेवत ठेवण्यात आली होती. आंदोलनाची तीव्रता पुरंदर तालुक्यातील प्रत्येक गावात पोहोचली असून गावोगावी रास्ता रोको, सरकारचा निषेध आंदोलन सुरू झाली आहेत.
माहिती व जन संपर्क कार्यालयाच्या वतीने विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी सासवड येथे आलेल्या जनसंपर्क रथावरील माहितीफलक मराठा आंदोलकांच्या वतीने शासनाचा निषेध करत फाडण्यात आले. दरम्यान, पुरंदर तालुक्यातील पारगाव-मेमाणे येथे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले व निषेध करत तालुक्यात फिरू न देण्याचा इशारा दिला.