सुयोग्य नियोजन : आपण आजपर्यंत काय केले याचा आता विचार करू नका, राहिलेल्या दिवसांचे, दैनिक, साप्ताहिक, मासिक, विषयनिहाय नियोजन करा. यशासाठी सुयोग्य नियोजन व तंतोतंत पालन करा.
स्वंयअध्ययन : मुलांनो, तुम्ही खूप हुशार आहात, मला येत नाही, जमत नाही, समजत नाही, असे विचार काढून टाका. स्वत:ला ओळखा, लिहिता येते, वाचता येते, मूलभूत संकल्पना स्पष्ट आहेत, त्या करुन घ्या, ज्ञानाचे उपयोजन करा, समजून घेण्यासाठी, पालक, शिक्षक, ताई-दादा, आजी-आजोबा व तंत्रज्ञान यांची मदत घेवून अभ्यासातील/विषयांतील शंकाचे निरसन करुन घ्या.
गणित, इंग्रजी, अकांऊटस्, भौतिक, रसायन यांसारखे विषय सोडले तर, इतर विषयांचा अभ्यास तुम्ही स्वत: करु शकता, समजून, आकलन करु शकता, यावर विश्वास ठेवा. ज्या विषयांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, त्यासाठी वेबसाईट्स, तंत्रज्ञान यांची मदत घेते. सर्व पाठ्यपुस्तके उत्कृष्ट आहेत. त्यातील स्वाध्याय सोडवा.
कोरोनाच्या काळात -
शाळा, कॉलेज यांनी ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षण दिले आहे. याचा व पाठ्यपुस्तकांसह, इतर तंत्रज्ञानावरील साहित्याचा पूरक वापर अभ्यासासाठी व परीक्षेच्या माहितीसाठी उपयोग करुन घ्या. शालेय शिक्षण विभाग, यांचे विविध उपक्रम, दूरदर्शनवरील वर्ग, ऑनलाईन व्याख्याने, टिलीमिलीमधील कार्यक्रम यांचा उपयोग करुन स्वत:च्या संकल्पना स्पष्ट करुन अभ्यास करा. दररोजचे नियोजन, पुरेशी झोप, घरातला व्यायाम, प्राणायाम यासाठी वेळ द्या, सकारात्मक बातम्या, मनोरंजन, अवांतर वाचन यासाठी थोडा वेळ काढा. कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळा. अभ्यासात मन लागत नसेल तर चिंतन, ममन करा. एकाग्रतेसाठी हातात पेन, कोरे कागद घेऊन लिहून अभ्यास करा. नोट्स तयार होतील व यातूनच उजळणी होईल.
माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा :
शालेय जीवनाचा पहिला व दुसरा टप्पा, शाखा निवड, करिअरचा टर्निंग पॉईंट, म्हणजे या दोन परीक्षा आहेत. याचा ताण घेऊ नका. आता कसे होणार, किती टक्के मिळतील, याचा विचार करु नका. यश नक्की मिळेल. गरज आहे- योग्य नियोजन, मार्गदर्शन व स्वयंअध्ययन या त्रिसूत्रींची.
मुलांनो, कोरोनाच्या संसर्गजन्य रोगामुळे आलेल्या व्यत्ययावर तुम्ही मात करु शकता. त्याकरिता आत्मबळ, इच्छाशक्ती आणि स्वयंअध्ययन करुन एकलव्य व्हा. यश संपादन करणे सहजशक्य आहे. मित्रांनो ताण घेऊ नका, गरज भासल्यास, शाळा, मंडळ, शिक्षक, पालक, समुपदेशक यांचेशी संवाद साधा. तुम्ही निश्चित रहा, सर्व तुमच्या सोबतच आहोत.
- अनिल गुंजाळ, शैक्षणिक समुपदेशक