पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील सुमारे १ हजाराहून अधिक संलग्न महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमधील तब्बल साडेपाच लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहे. पुणे विद्यापीठाच्या परीक्षा १५ मार्चपासून घेतल्या जाणार होत्या. मात्र, जुन्याच एजन्सीला परीक्षा घेण्याचे काम देणे नियमात बसत नसल्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ विद्यापीठावर आली. अखेर परीक्षा मंडळ, व्यवस्थापन परिषद आणि पर्चेस कमिटीच्या मान्यतेनंतर परीक्षेची जबाबदारी एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशन या कंपनीकडे सोपविली गेली. या कंपनीने परीक्षेची सर्व तयारी पूर्ण केली असून सध्या विद्यार्थ्यांची मॉक टेस्ट घेतली जात आहे.
परीक्षा या विशिष्ट नियमावलीचे चौकटीत घेणे गरजेचे आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठासह राज्यातील सर्वच विद्यापीठांत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घ्याव्या लागत आहेत. याचाच अर्थ विद्यार्थी घरी बसून परीक्षा देणार आहेत. घरी बसून जरी परीक्षा होणार असले तरी प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातचालीवर विद्यापीठाची बारीक नजर असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान कॉपी किंवा इतर गैरप्रकार केल्यास त्यांना विद्यापीठाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी येऊ नये, यासाठी सराव परीक्षा घेतली जात आहे. आत्तापर्यंत सुमारे तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा सराव केला आहे. विद्यापीठाकडून ५ लाख ६३ हजार २२६ विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिन आयडीवर आणि नोंदणीकृत मोबाईलवर मॉक टेस्ट संदर्भात एसएमएस पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिली आहे, त्यांना प्रत्यक्षात ऑनलाइन परीक्षा देताना अडचणी येणार नाहीत, अशी अपेक्षा आहे.
विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्याने दिलेल्या परीक्षेची माहिती स्वतःकडे ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी स्क्रीन शॉट काढून ठेवावेत, असे विद्यापीठानेसुद्धा स्पष्ट केले आहे. तसेच परीक्षेबाबत काही तक्रारी असल्यास विद्यार्थ्यांना परीक्षा झाल्यानंतर पुढील ४८ तासांत ऑनलाइन पद्धतीने तक्रार नोंदवण्याची संधी उपलब्ध आहे. दिलेल्या कालावधीनंतर विद्यापीठाकडून कोणत्याही सबबीवर कुठलीही तक्रार स्वीकारून घेतली जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना याबाबत काळजी घ्यावी लागणार आहे.
विद्यापीठाच्या एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशन या कंपनीची एवढ्या मोठ्या प्रमाणावर परीक्षा घेण्याची पहिलीच वेळ आहे. सुरळीतपणे परीक्षा घेण्यात कंपनीला यश आले तर यापुढील काळात ही कंपनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा घेऊ शकते. परंतु, परीक्षा घेण्यात कंपनी अपयशी ठरल्यास विद्यापीठावर या कंपनीला टाळे लावण्याची वेळ येऊ शकते. विद्यापीठाने कंपनीवर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे केवळ विद्यार्थ्यांचीच नाही तर विद्यापीठाचीसुद्धा ही सर्वात मोठी परीक्षा आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
- राहुल शिंदे, वरिष्ठ बातमीदार, लोकमत पुणे आवृत्ती
--
प्राॅक्टर्ड परीक्षा
ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडे फ्रंट कॅमेरा असणारा मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर उपकरण असणे गरजेचे आहे. विद्यापीठातर्फे इमेज प्रॉक्टर्ड पद्धतीने ही परीक्षा घेतली जात आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने परीक्षा देत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे छायाचित्र काढून घेतले जाणार आहे. परीक्षेदरम्यान काही ठराविक कालावधीनंतर ही छायाचित्रे सातत्याने काढून सेव्ह केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थी परीक्षेदरम्यान गैरप्रकार करत असल्याचे आढळून आल्यास त्याला ''अलर्ट'' केले जाईल. त्यामुळे एकदा परीक्षा देण्यासाठी बसलेल्या विद्यार्थ्याला कॅमेरा समोरून हलता येणार नाही. विद्यापीठाने प्रॉक्टर्ड पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत.
---
किती विद्यार्थी देणार परीक्षा
विज्ञान पदवी : ८८ हजार ८६५
विज्ञान पदव्युत्तर पदवी : १८ हजार २३५
अभियांत्रिकी पदवी : १ लाख ६० हजार
अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी : २,९१६
वाणिज्य पदवी : १ लाख ४० हजार ८१०
वाणिज्य पदव्युत्तर पदवी : १३ हजार १८
कला पदवी : ६८ हजार ६७२
कला पदव्युत्तर पदवी : १२ हजार ६९८
फार्मसी पदवी: १९ हजार ४५८
फार्मसी पदव्युत्तर पदवी: १ लाख ४२३
विधी पदवी : १८१
विधी पदव्युत्तर पदवी: ७५७
मॅनेजमेंट पदवी: ९६६
मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी: ३३ हजार ५५७