पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांकडून घेतल्या जाणाऱ्या सर्व शाखांच्या प्रश्नपत्रिका संकेतस्थळाच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांना आॅनलाइन पाठविल्या जातात. नाशिकमधील इंजिनिअरींगच्या दोघा विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक करून बीएस्सी द्वितीय वर्षाच्या प्रश्नपत्रिका फोडल्या असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आल्याने विद्यापीठाच्या परीक्षा व्यवस्थेलाच मोठे खिंडार पडले आहे. यामुळे परीक्षा यंत्रणेतील मोठी त्रुटी उजेडात येऊनही विद्यापीठ प्रशासन त्याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.देशात एनआरएफ रँकिंगमध्ये नववा क्रमांक मिळविणाºया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून बीए, बीकॉम, एमए, एमकॉम, बीएएस्सी, एमएस्सी, विधी, इंजिनिअरिंग, एमबीए आदी सर्व शाखांच्या प्रश्नपत्रिका संकेतस्थळाद्वारे आॅनलाइन परीक्षा केंद्रांना पाठविले जातात. इंजिनिअरिंगच्या दोघा विद्यार्थ्यांना यामधील त्रुटी हेरून प्रश्नपत्रिका फोडल्या. बीएस्सीचा पेपर व्हायरल झाल्यानंतर याचा पर्दाफाश झाला असला तरी याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील आयटीचे तृतीय व चतुर्थ वर्षातील विद्यार्थी गजेंद्र चोपडे व चिन्मय अटराव्हलकर यांनी विद्यापीठाची वेबसाईट हॅक कशाप्रकारे केली हे लेखी लिहून दिले आहे. या पद्धतीने विद्यापीठाचे यापूर्वी किती प्रश्नपत्रिका फोडल्या गेल्या आहेत. असे प्रकार घडत असताना ते विद्यापीठ प्रशासनाच्या निर्दशनास कसे आले नाहीत, संकेतस्थळ हॅक करून प्रश्नपत्रिका फुटल्याचे बाहेरच्या लोकांनी निर्दशनास आणून दिल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाला त्याची माहिती मिळाली. या प्रकारामध्ये परीक्षा विभागातील तसेच महाविद्यालयांमधील अधिकारी, प्राध्यापक व कर्मचारी यांचा समावेश आहे का, याची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे. विद्यापीठाचे सुसज्ज असा आयटी विभाग असताना प्रश्नत्रिका व संकेतस्थळाच्या सुरक्षेबाबत योग्य ती काळजी घेण्यात आली नाही याबाबतही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.विद्यापीठ प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून केवळ चौकशी चालू असल्याचे उत्तर देण्यात आले आहे. कुलगुरूंनी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने याप्रकरणाची चौकशी केली असता यामध्ये दोन व्यक्ती दोषी असल्याचे आढळून आले. ही पेपरफुटी इलेक्ट्रॉनिक माध्यमामधून करण्यात आल्याने या प्रकरणी नाशिक येथे सायबर गुन्हे शाखेकडे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी आता सायबर गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे असे मोघम उत्तर विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आले आहे.फुटलेले पेपर पुन्हा कधी घेणार?1सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक करून बीएस्सीच्या प्रश्नपत्रिका फोडल्याप्रकरणी नाशिक सायबर सेलकडे गुन्हा दाखल झाला आहे.2पेपरपूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याने ते पेपर पुन्हा घेतले जाणार का, बीएस्सीचे सर्व पेपर पुन्हा घेतले जाणार की केवळ ज्या प्रश्नपत्रिका फुटल्या तेच पेपर पुन्हा घेणार, नाशिक, नगर व पुणे या तिन्ही जिल्ह्यांत फेरपरीक्षा घेणार की केवळ नाशिकमध्येही फेर परीक्षा होणार, आदी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.3समितीचा अहवाल मिळाल्यानंतर निर्णय घेऊअसे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यातआले आहे.परीक्षार्थीहवालदिलसंकेतस्थळ हॅक करून बीएस्सीच्या प्रश्नपत्रिका फोडल्याचे उजेडात आल्याने परीक्षार्थींना मोठा धक्का बसला आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून त्याबाबत योग्य खुलासा न झाल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
परीक्षा व्यवस्थेलाच खिंडार, विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक करून फोडल्या प्रश्नपत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 2:44 AM