पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या ११ एप्रिलपासून सुरू होणऱ्या ऑनलाईन परीक्षांसाठी कंपनी बदलली असली, तरी सर्व विषयांची परीक्षा प्रॉक्टर्ड पध्दतीनेच होणार आहे. त्याचप्रमाणे परीक्षेपूर्वी सुमारे सात ते आठ दिवस आधी विद्यार्थ्यांना मॉक टेस्टची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे परीक्षेदरम्यान अडचणी येणार नाहीत, असा विश्वास विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच विद्यापीठांना ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घ्यावी लागत आहे. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेणाऱ्या विविध एजन्सीकडे विद्यापीठाला जावे लागते. पुणे विद्यापीठाने ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या. मात्र, अंतिम वर्षाच्या परीक्षेत झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने योग्य पध्दतीने आणि चांगल्या एजन्सीची निवड करणे अपेक्षित होते. परंतु, विद्यापीठाकडून एजन्सी निवडीच्या कार्यपध्दतीत चूक झाली. त्यामुळे विद्यापीठाच्या एसपीपीयू एज्युटेक फाऊंडेशन या कंपनीला परीक्षेचे काम देण्याचा निर्णय घ्यावा लागला.
विद्यापीठाच्या परीक्षा आता केवळ ऑनलाईन पध्दतीनेच होणार आहेत. त्यामुळे परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी गैरप्रकार करू नये, यासाठी विद्यापीठाकडून प्रॉक्टर्ड पध्दतीचा अवलंब केला जाणार आहे. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्याचे काही फोटो ठराविक कालावधीत सॉफ्टवेअरच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. एका पेक्षा अधिक व्यक्ती फोटोमध्ये दिसून आल्यास किंवा काही गैरप्रकार करताना अढळून आल्यास संबंधित विद्यार्थ्यावर कारवाई केली जाणार आहे.
---
सरावासाठी अवधी देणार; अडचणी येणार नाहीत
विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. तसेच यंदा परीक्षेचे काम दुसऱ्या कंपनीकडे दिले आहे. त्यामुळे येत्या ११ एप्रिल रोजी सुरू होणाऱ्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना सरावासाठी अवधी देण्यात येणार असल्याने परीक्षेदरम्यान अडचणी येणार नाहीत, असा विश्वास परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.