पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे १० एप्रिलपासून प्रथम सत्राच्या ऑनलाइन परीक्षा सुरू झाल्या असून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपली आहे. आता परीक्षा विभागाकडून पारंपरिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत जाणार आहे, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले.
विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यामधील संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. अभियांत्रिकीसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या बहुतेक परीक्षा संपल्या आहेत. शनिवारपासून कला शाखेच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. रविवारी (२५) ९७ विषयांची परीक्षा घेतली. परीक्षा देणाऱ्या एकूण ९३ हजार १४७ विद्यार्थ्यांपैकी ८७ हजार ७०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सकाळच्या सत्रात २८ हजार, दुपारच्या सत्रात ४० हजार तर सायंकाळच्या सत्रात १८ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
मागील वर्षी अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेताना अनेक अडचणी आल्या होत्या. मात्र, यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरळीतपणे पार पडल्या आहेत. आता कला, वाणिज्य व विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. दिवसेंदिवस परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होणार असल्यामुळे यापुढील काळात सुद्धा परीक्षा घेण्यास अडचणी येणार नाहीत, असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला.