लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: बनावट गुणपत्रिका सादर करून एमबीए अभ्यासक्रमास प्रवेश मिळवणे, गुणपत्रिका पडताळणीसाठी आॅनलाइन सुविधा उपलब्ध न करून देणे आदी कारणांमुळे अॅटमा,जी मॅट, मॅट आणि झॅट या चार खासगी प्रवेश परीक्षांद्वारे महाराष्ट्रात प्रवेश घेण्यावर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घातलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे आता या चारही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या ‘एमबीए/ एमएमएस’ अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्याच्या प्रवेश परीक्षा कक्षातर्फे राज्यातील ‘एमबीए/एमएमएस’ची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. एमबीए सेट सह ‘कॅट’, ‘सीमॅट’ या शासकीय परीक्षांसह खासगी संस्थांतर्फे जीमॅट, झॅट, मॉट आणि अॅटमा या चार परीक्षांचाही अंतर्भाव आहे. परंतु, राज्यात २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात २६ विद्यार्थ्यांनी तर २०१९-२० मध्ये २९ विद्यार्थ्यांनी अॅमाची बनावट गुणपत्रिका देऊन प्रवेश घेतला होता. पुण्यात बनावट गुणपत्रिका सादर करून पाच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यामुळे खासगी संस्थांद्वारे घेतल्या जाणा-या प्रवेश परीक्षेतून राज्यात एमबीए अभ्यासक्रमास प्रवेश दिले जाणार नसल्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर म्हणाले, खासगी संस्थांच्या परीक्षा देणारे बरेच विद्यार्थी हे परराज्यातील असतात. परंतु, या विद्यार्थ्यांनी शासकीय परीक्षा न दिल्यामुळे पुण्यासह राज्यातील इतर व्यवस्थापन संस्थांमध्ये त्यांना प्रवेश घेता येत नव्हता. त्यामुळे शैक्षणिक संस्थांचेही नुकसान होत होते. एआयसीटीईने निर्देश देऊनही तंत्र शिक्षण विभागाने याबबात निर्णय घेतला नव्हता. मात्र, उच्च न्यायालयाने याबाबत निर्णय दिल्याने अॅटमा, जी मॅट, मॅट आणि झॅट या चार खासगी संस्थांच्या प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा राज्यातील प्रवेशचा मार्ग मोकळा झाला आहे.
-------------------
एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आता अधिक परीक्षांचे पर्याय उपलब्ध होतील.त्यामुळे विद्यार्थी चांगले गुण मिळवून दर्जेदार संस्थेत प्रवेश घेऊ शकतील.तसेच शैक्षणिक संस्थांनाही अधिकाधिक विद्यार्थी मिळतील.
- रवी चिटणीस, प्र-कुलगुरू, एमआयटी