सेतू, महा-ई-सेवा केंद्रे अनियंत्रित, नागरिकांची होतेय पिळवणूक
मेखळी : सर्वसामान्यांची सोय व्हावी, त्यांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत, या उद्देशाने शासनाने सुरू केलेली महा ई सेवा केंद्रे प्रत्यक्षात नागरिकांची महालूट करणारी ठरत आहेत. केंद्रचालकांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने योजनेच्या मूळ हेतूलाच धक्का बसत असल्याचे चित्र बारामतीमध्ये निर्माण झाले आहे.
बारामती तहसील कार्यालयातील नागरिक सुविधा केंद्रामध्ये नागरिकांना, विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे उत्पन्नाचे, जातीचे, डोमिसाईल, वारस, प्रतिज्ञापत्र आदी दाखले शासकीय दरात दिले जातात. परंतु हेच नागरिक सुविधा केंद्र सध्या नागरिकांच्या पिळवणुकीचे केंद्र बनत चालले आहे. येथील काही कर्मचारी ग्राहकांची गरज ओळखून कमी वेळात दाखले देतो म्हणून जादा दर (२०० ते ३०० रुपये) आकारत आहेत. तसेच जादा दर आकारून देखील ग्राहकांना ठरलेल्या वेळेत हे दाखले मिळत नाहीत. ग्राहकांनी दाखल्यासंदर्भात विचारणा केली तर 'तुमची पावती देतो, तुम्ही दाखला सोडायला सांगा' अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने ग्राहकांची मात्र धावपळ होत आहे. परंतु कर्मचाऱ्यांकडून मिळणारी वागणूक, होणारी आर्थिक लूट तसेच केंद्र चालकांवर व कामगारांवर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे त्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
शासकीय दरापेक्षा अधिकची रकमेची आकारणी केली जाते. अर्जंट दाखला पाहिजे असे सांगितले तर यांचा दर कैकपटीने वाढून २०० ते ३०० रुपये होतो. आणि जादाचे दर आकारून देखील दाखले वेळेवर मिळत नाहीत. परिणामी नियोजित कामे लांबणीवर पडतात.
नानासो काशिद, ग्राहक
———————————————
नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे जादा पैसे देऊ नयेत, सर्व प्रकारचे दाखले ठरलेल्या वेळेत दिले जातील. जर दाखले वेळेत न मिळाल्यास तक्रार करावी. जादा पैसे घेणाऱ्यांची पुराव्यासाहित तक्रार करावी, संबंधितांवर योग्य कारवाई केली जाईल.
विजय पाटील, तहसीलदार, बारामती