पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्रथम वर्ष व अंतिम पूर्व वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉग व श्रेणी सुधार परीक्षा किरकोळ तक्रारी वगळता मंगळवारपासून सुरळीतपणे सुरू झाल्या. त्याचप्रमाणे परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत; यासाठी विद्यापीठाने नव्या दोन सुविधा सुरू केल्या आहेत.
पुणे विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील सुमारे २ लाख १८ हजार विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा येत्या ८ ते २३ डिसेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून होणारी परीक्षा सुरळीतपणे पार पडणार का ? याकडे सर्वांचे लक्ष होते. मंगळवारी संस्कृत विषयाच्या विद्यार्थ्यांना वेगळा पेपर मिळणे, काही विद्यार्थ्यांना वेगळ्या माध्यमाची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली,अशा अडचणी विद्यार्थ्यांना आल्या.
विद्यापीठाशी संलग्न तीनही जिल्ह्यांमधील ४९ हजार ३७९ विद्यार्थ्यांनी मंगळवारी परीक्षा देणे अपेक्षित होते. परंतु ,३१ हजार २३९ विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली. काही विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न विचारण्यात आले असल्याचा दावा केला.
-------------
अंतिम वर्षाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देऊन पेपर सबमिट केलेला असताना अनुपस्थित दाखविण्यात आले. त्यामुळे विद्यापीठाने पेपर दिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या लॉगीन मध्ये दिलेला पेपर व्यवस्थित सबमिट झाला किंवा नाही याची माहिती २४ तासाच्या आत उपलब्ध करून दिली जाणार आहे. स्वतःच्या पीआरएन नंबर चा वापर करूनच परीक्षा देता येणार आहे. या दोन सुविधा विद्यापीठाने दिलेल्या आहेत. प्रॉक्टर पद्धतीचा वापर करून विद्यापीठाने परीक्षा घेतली आहे.
- महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ