पुणे : गेल्या तीन दिवसांपासून शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. काल रात्री पावसाने उच्चांक गाठला. शहरातील सर्वच रस्ते मध्यरात्री जलमय झाले हाेते. त्यातच पर्वती पाणीपुरवठा केंद्राच्या पंपींग स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने तेथे बिघाड झाला आहे. त्यामुळे आज शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार असून पुढील पाच दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
गेल्या तीन दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस काेसळत आहे. ढगफुटी झाल्यासारखा पाऊस काेसळत असल्याने अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे. दांडेकर पुलाजवळील अंबिल ओढ्यातील पाणी येथील वसाहतीत शिरल्याने शेकडाे लाेक बेघर झाले. तर अरण्येश्वर भागात भिंत काेसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीचा फटका जलवाहिण्यांना देखील बसला आहे. पर्वती पाणीपुरवठा केद्रातील जलवाहिन्यांना झालेल्या अडथळ्यामुळे नवी पेठ ते प्रभात रस्ता या भागात आज पाणीपुरवठा हाेणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
यामध्ये प्रामुख्याने लालबहादूर शास्त्री रस्ता, लोकमान्य कॉलनी, नवीपेठ, अलका सिनेमा चौक,पूना हॉस्पिटल, पाठक बाग, राजेंद्रनगर,वैकुंठ स्मशानभूमी, डेक्कन, पुलाचीवाडी, प्रभात रस्ता, या परिसरास पाणीपुरवठा होऊ शकणार नाही, तसेच पद्मावती पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने सर्व पंप / मोटार नादुरूस्त झाले आहेत. त्या मुळे पद्मावती पंपिंग स्टेशन वर अवलंबून असणाऱ्या बिबवेवाडी, कोंढवा, मर्केट यार्ड परीसर, धनकवडी, बालाजी नगर, सहकार नगर परीसर सातारा रोड परीसर आदी भागांना पाणीपुरवठा हाेणार नाही. तसेच पुढील पाच दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा हाेणार आहे.