पुणे : दोन महिलांचे मृतदेह ससून रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले होते. शनिवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी मृतदेह देताना एका महिलेचा मृतदेह दुसऱ्या कुटुंबीयांना दिला. त्यानंतर दुसरे कुटुंबीय मृतदेह घेण्यासाठी आले, तेव्हा त्यांचा नातेवाईक महिलेचा तो मृतदेह नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत पहिल्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारही केले हाेते. ससून रुग्णालयात मृतदेह अदलाबदली होण्याची घटना पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. त्यामुळे एका कुटुंबीयाला दोनदा अंत्यसंस्कार करावे लागले, तर दुसऱ्या कुटुंबीयांना केवळ अस्थी घेण्याची वेळ आली.
मंदाकिनी सुहास धिवर (वय ६२, रा़ आशानगर, गणेशखिंड) आणि विमल वसंत पारखे (वय ७०, रा़ धनकवडी) अशी निधन झालेल्या या दोन महिलांची नावे आहेत. दोन्ही महिलांचा नैसर्गिकरीत्या निधन झाले होते. त्यांच्यावर दुसऱ्या दिवशी अंत्यसंंस्कार करण्यात येणार असल्याने नातेवाईकांनी ते ससून रुग्णालयातील शवागारात ठेवले होते. दोन्ही मृतदेह मेडिको लीगल केस नव्हती. त्यामुळे त्यांच्याकडून शुल्क भरून ते शवागारात ठेवण्यात आले होते. याबाबत मोबीन सय्यद यांनी सांगितले, की आमच्या नातेवाईक मंदाकिनी धिवर यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने आपण शुक्रवारी सायंकाळी शवागारात पार्थिव ठेवले होते. शनिवारी सकाळी आम्ही धिवर यांचे पार्थिव घेण्यासाठी गेलो,तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी दुसऱ्याच महिलेचा मृतदेह आम्हाला दाखविला. आम्ही त्यांना हा मृतदेह आमच्या नातेवाईक महिलेचा नसल्याचे सांगितले. त्यांनी चौकशी केल्यावर विमल पारखे यांचा मुलगा उत्तम पारखे हे शनिवारी सकाळी साडेआठ वाजता शवागारात आले होते. त्यांना तेथील कर्मचाऱ्यांनी मृतदेह दाखविला त्यांनी तो आपल्या आईचा असल्याचे सांगितले.
पारखे यांनी आवश्यक कागदपत्रे पूर्ण केली आणि मग तो मृतदेह ताब्यात घेतला. कर्मचाऱ्यांनी पारखे यांच्याशी संपर्क साधला व त्यांना पुन्हा शवागारात बोलावून घेतले. त्यांना दुसरा मृतदेह दाखविला. तेव्हा उत्तम पारखे यांनी हीच आपली आई असल्याचे सांगितले. दोन्ही कुटुंबीयांचे प्रत्येकी १५ ते २०ॉ नातेवाईक शवागारात जमले. ससून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही कुटुंबीयांची समजूत काढली. दरम्यान, पारखे यांनी धिवर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही केले होते. दोन्ही कुटुंबासमोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला होता.
उत्तम पारखे यांना दुसऱ्यांदा शवागारात बोलावून घेतल्यानंतर त्यांना दुसरा मृतदेह दाखविला. तो पाहून आपण आपल्या आईलाच ओळखू शकलो नसल्याचा उत्तम पारखे मोठा धक्का बसला. धिवर कुटुंबीयांनी संयम दाखवत दुसरा मृतदेहही पारखे यांना देण्यास मान्यता दिली. त्यानंतर पारखे कुटुंबीयांनी नंतर विमल पारखे यांच्यावर अंत्यसंस्कार केले. पहिल्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणची अस्थी धिवर कुटुंबीयांकडे देण्यात येणार आहे.
प्रकरणाची हाेणार चाैकशीया संपूर्ण प्रकरणाबाबत ससून रुग्णालयाचे प्रभारी उपअधिष्ठाता डॉ़ मुरलीधर तांबे यांनी सांगितले, की दोन्हीही महिलांचे निधन नैसर्गिकरीत्या झाले होते. त्यांच्या नातेवाईकांनी रीतसर शुल्क भरून रात्रीपुरते मृतदेह ठेवले होते. अशा प्रकारे मृतदेहांची अदलाबदल कशी झाली, याची चौकशी करण्यासाठी प्रा. डॉ़ कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर आपण योग्य ती कारवाई करणार आहोत.
दाेषींवर हाेणार कडक कारवाईनातेवाईक चुकीने दुसराच मृतदेह घेऊन गेल्याने हा प्रकार घडला आहे. त्याबाबत शवागृहातील कर्मचाऱ्यांची काही चूक झाली का, याची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.- डॉ. मुरलीधर तांबे, उपअधिष्ठाता, ससून रुग्णालय