पुणे: औंध जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दाेन रुग्णांना येथील डयूटीवरील परिचारिकांच्या निष्काळजीपणामुळे रक्तपिशव्यांची अदला - बदली झाली हाेती. याप्रकरणाची चाैकशी केल्यानंतर प्राप्त अहवालानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. नागनाथ यमपल्ले यांनी मंगळवारी दि. २६ राेजी दाेन अधिपरिचारिकांना तडकाफडकी निलंबित केले आहे. अधिपरिचारिका प्रीती ठाेकळ आणि अधिपरिचारिका शांता मकलूर अशी निलंबित केलेल्या अधिपरिचारिकांची नावे आहेत.
हा गंभीर प्रकार शनिवारी दि. २३ राेजी घडला हाेता. ज्येष्ठ नागरिक असलेले रुग्ण दत्तू सोनाजी सोनवणे यांना न्यूमाेनिया झाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. डाॅक्टरांनी सोनवणे यांना रक्त चढवण्याचे उपचार सुचवले हाेते. तसेच, शेजारीच असलेले ज्येष्ठ नागरिक दगडू कांबळे यांनाही रक्त चढवायचे हाेते. साेनवणे यांचा रक्तगट ए पॉझिटिव्ह, तर कांबळे यांचा रक्तगट बी पॉझिटिव्ह हाेता. त्यांच्या नावाने रक्ताच्या पिशव्यादेखील आल्या व त्याच्यावर नावे बराेबर हाेती.
रक्त चढवण्याची जबाबदारी असलेल्या या दाेन्ही अधिपरिचारिकांनी निष्काळजीपणा करत सोनवणे यांची पिशवी कांबळे यांना, तर कांबळे यांची पिशवी साेनावणे यांना चढवली. त्याची रिॲक्शन आल्यानंतर दाेन्ही रुग्णांना तत्काळ आयसीयू कक्षात उपचारासाठी शिफ्ट करण्यात आले. परंतू हा प्रकार गंभीर असल्याने या प्रकरणाची चाैकशी करून अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई केली