पुणे : पुण्याजवळील दिवे घाटातून स्कॉर्पिओ गाडीच्या बोनेटवर बसून लग्नमंडपात एंट्री घेणाऱ्या नववधूची सोशल मीडियावर जोरदार चांगलीच चर्चा रंगली होती. तसेच तिचा बोनेटवर बसलेला फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. उत्साहाच्याभरात आणि काहीतरी वेगळं करण्याच्या नादात काढलेल्या नववधूच्या या 'हटके'पणावर नेटकऱ्यांनी कौतुकापेक्षा टीकेचा भडीमार केला होता. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील झाला आहे. मात्र,नवरीमुलीच्या आईने प्रतिक्रिया दिली असून तो व्हिडिओ व्हायरल न करण्याची आर्त हाक विनंती केली आहे.
लोणी काळभोर मास्क न वापरता वधूराणीला मोटारीच्या बोनेटवर बसून मंगल कार्यालयाच्या दिशेने व्हिडिओ शुटींग करत प्रवास करणे महागात पडले असून लोणी काळभोर पोलिसांनी वधूसमवेत चालक, व्हिडिओग्राफर तसेंच गाडीतील इतरांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा व महाराष्ट्र कोविड उपाय योजना कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात केला आहे.
मात्र, याचवेळीसंबंधित मुलीची आई आणि मामा यांनी आनंदाच्या भरात हा व्हिडीओ शूट केला होता, आता व्हायरल करु नका असे भावनिक आवाहन केले आहे. तसेच कोणालाही त्रास द्यायचा आमचा उद्देश नव्हता. नवरी मुलीचा मामा म्हणाला, शुभांगीच्या वडिलांचे २००४ साली निधन झाले. त्यावेळी ती अगदी सहा वर्षांची होती. आईने मोठ्या कष्टाने तिला मोठे केले. तिचे नुकतेच सासवडमध्ये लग्न झाले. आनंदाच्या भरात गाडीच्या बोनेटवर बसून तिने व्हिडीओ शूट केला.
पोलीस हवालदार एस. एल. नेवसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वधू शुभांगी शांताराम जरांडे ( वय २३ ), मोटार चालक गणेश श्यामराव लवांडे ( वय ३८, दोघे रा. सहकार कॉलनी, चक्रपाणी वसाहत, गणेश मंदिराजवळ, भोसरी, पुणे ) व व्हिडिओग्राफर तुकाराम सौदागर शेडगे वय २३ रा वाल्हेकरवाडी आकुर्डी ) आणी स्कार्पिओ गाडीमधील इतर इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या संकटातही विशेष काळजी घेत सध्या अनेक ठिकाणी छोटेखानी विवाहसोहळे पार पडत आहेत. सोशल मीडियाच्या युगात लग्न सोहळ्यांचा ट्रेंड पूर्णतः बदलून गेला आहे. त्यातच नवरी मुली बैलगाडी, घोडा, हॅलिकॅप्टरने लग्नमंडपात 'रॉयल एण्ट्री' करू लागल्या आहेत.
सासवड ( ता. पुरंदर ) परिसरातील सिध्देश्वर मंगल कार्यालयात मंगळवारी (१३ जुलै ) शुभांगी हिचा विवाह सोहळा पार पडला होता. लग्नासाठी जात असताना वधूने दिवे घाटातून चक्क मोटारीच्या बोनेटवर बसून मंगल कार्यालयाच्या दिशेने प्रवास केला. नववधूला धोकादायक पद्धतीने बोनेटवर बसवून मोटार सायकलवर तुकाराम शेडगे हा व्हिडीओ शूटिंग करत असताना सर्वजण चेहऱ्याला मास्क न घातलेले मिळून आले. पोलिसांनी ४० हजार रुपये किमतीचा सोनी कंपनीचा कॅमेरा जप्त केला आहे. तसेच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक ए. एम. काटे करत आहेत.