सांगवी : सांगवी (ता. बारामती ) येथील वर्षापूर्वी विवाह झालेल्या विवाहित महिलेने विष पिऊन आत्महत्या केल्याने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.
विषप्राशन केल्या नंतर दोन दिवसांपूर्वी संतापलेल्या महिलेच्या नातेवाईकांनी बारामतीच्या खासगी रुग्णालयात गोंधळ घातला होता. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांनी सांगवीत पहारा दिला.
मात्र, आत्महत्येचे कारण उघड न झाल्याने ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या घटनेमुळे मृत महिलेच्या माहेरकडील संतापलेल्या नातेवाईकांकडून विपरीत घटना घडू नये, यासाठी परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधितेसाठी बारामती तालुका पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. या प्रकाराबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.
सांगवी येथील गितांजली अभिषेक तावरे (वय २१) असे विवाहितेचे नाव आहे. तिने राहत्या घरात दोन दिवसांपूर्वी विषप्राशन केले होते. दरम्यान विवाहित महिलेला बारामतीमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास आले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यास आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
दोन दिवसांपूर्वी बारामती येथील खासगी रुग्णालयाच्या आवारात विवाहितेच्या माहेरकडील नातेवाईकांकडून घटनेमुळे गोंधळ घातला होता. याच पार्श्वभूमीवर विवाहितेच्या मृत्यूनंतर गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राहण्यासाठी बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी सकाळपासूनच मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे.
फोटो ओळ : सांगवीत विवाहित महिलेच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर तैनात करण्यात आलेला पोलीस बंदोबस्त.