पुणे: गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव निर्बंधांखाली साजरा केला जात होता. संपूर्ण जगभरात आकर्षण असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाला शतकोत्तर परंपरा आहे. या गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध दूर केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये उत्साह आला आहे. गणराज विराजमान होण्यासाठी ३९ दिवस बाकी असताना हा निर्णय घेतल्याने गणेश मंडळांना पुढील तयारीसाठी वेळ मिळणार आहे.
यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा होणार असल्याने शहारातील गणेश मंडळांनी कामाला सुरुवात देखील केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सायंकाळी ढोल ताशा पथकांचा अधिक उत्साहात सराव सुरू झाला होता. मानाच्या गणेश मंडळांचे या निर्णयाबाबत काय मत आहे, हे ‘लोकमत’ने जाणून घेतले.
सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाचे पालन करूनच गणेशोत्सव साजरा करू
अत्यंत स्वागतार्ह निर्णय राज्य सरकारने घेतला आला आहे. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवर जे खटले दाखल आहेत, ते मागे घेतले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आजवर अनेकदा असे म्हटले गेले; पण त्यावर ठोस भूमिका कोणीही घेतली नाही. त्यामुळे याबाबतीत कालमर्यादा ठरवणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनिक्षेपकांबाबतीत असलेल्या आदेशाचे पालन करूनच आम्ही गणेशोत्सव साजरा करू. - श्रीकांत शेटे, कसबा गणेश मंडळ
यंदाच्या वर्षी सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह
दोन वर्षे कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे गणेशोत्सव साजरा करता आला नसल्यामुळे यंदाच्या वर्षी सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून यावर्षी पारंपरिक पद्धतीने साजेसा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. - प्रसाद कुलकर्णी, अध्यक्ष, तांबडी जोगेश्वरी मंडळ
वैयक्तिक आम्ही काही नियमांचे देखील पालन करणार
गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे निर्बंधामध्ये गणेशोत्सव साजरा करावा लागला. यंदा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह खूप होता. मुख्यमंत्र्यांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने आनंद द्विगुणित झाला आहे; पण आम्ही मोठ्या थाटामाटात यंदाचा गणेशोत्सव साजरा करणार आहे, यात शंका नाही; पण वैयक्तिक आम्ही काही नियमांचे देखील पालन करणार आहोत. - प्रवीण परदेशी, गुरुजी तालीम गणेश मंडळ
जल्लोषात यंदाचा गणेशोत्सव साजरा करणार
यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात देखील कार्यकर्त्यांमध्ये साशंकता होती; पण या निर्णयामुळे ती दूर झाली. आम्ही सकारात्मक आणि मोठ्या जल्लोषात यंदाचा गणेशोत्सव साजरा करणार यात शंका नाही. गेल्या दोन वर्षांपासून आलेली मरगळ यामुळे निश्चितच दूर होईल.- नितीन पंडित, तुळशी बाग गणेश मंडळ
शांततेत गणेश उत्सव साजरा करण्यासाठी सर्व मंडळांचे प्रयत्न
या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करून गणेश मंडळांनी पोलीस व प्रशासनाला सहकार्य करून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शांततेत गणेश उत्सव साजरा करण्यासाठी सर्व मंडळांनी प्रयत्न केले पाहजेत. - हेमंत रासने, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट
शिर्डीचे साई बाबा यांच्या मंदिराचा आकर्षक देखावा
पालखी सोहळा संपन्न झाला, त्याचप्रमाणे यंदाचा गणेश उत्सव सरकारी नियमांचे पालन करून गणेश मंडळांचे कार्यकर्ते शांततेत साजरा करतील, असा विश्वास आहे. यावर्षी शिर्डीचे साई बाबा यांच्या मंदिराचा आकर्षक देखावा साजरा केला जाणार आहे. तसेच मडंप, लाउडस्पीकरबाबतचे परवाने एकाच ठिकाणी मिळावेत, अशी मंडळांची मागणी आहे. - बाळासाहेब मारणे, अध्यक्ष हुतात्मा बाबू गेनू ट्रस्ट
कोरोनाकाळात गणेश मंडळांचे मोठ्या प्रमाणावर काम
कोरोना हे जागतिक संकट होते. त्यामुळे सर्वांना निर्बंध पाळावे लागले. कोरोनाकाळात गणेश मंडळांनी मोठ्या प्रमाणावर काम केले. सध्या मंडईसह इतरत्र ठिकाणचा व्यापार कमी झाला आहे. हा लोकोत्सव लोकवर्गणीतून होत होता. त्याला आता व्यावसायिक स्वरूप आले आहे. बदलत्या काळात पुन्हा हा लोकोत्सव व्हावा. - भोला वांजळे, कार्यकारी अध्यक्ष, अखिल मंडई मंडळ