पुणे : मतदान केंद्रात कशा पध्दतीने मतदान प्रक्रिया पार पडते? याबद्दल अनेक जण अनभिज्ञ हाेते. मात्र, पहिल्यांदा मतदानाला आल्यामुळे सर्वांमध्ये उत्सुकता असल्याचे दिसून आले. राजकारणाबाबत तरूणाई सजग झाली आहे. काेण काेणते उमेदवार बारामती लाेकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत ? त्यांची वैयक्तीक, काैटुंबिक, राजकीय पार्श्वभूमी आहे ? सध्याचे राजकीय समीकरणे काय आहेत ? या सर्व बाबींचा अभ्यास करून ते सजगतेने आत्मविश्वासाने मतदान करताना दिसून आले.
महापालिका निवडणूका दाेन वर्षापासून रखडल्यामुळे अठरा वर्षे पूर्ण हाेऊनही अनेक तरूणांना पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लाेकसभा निवडणूकीपर्यंत वाट पहावी लागली. त्यामुळे पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरूणाईची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले. भर उन्हात सळसळत्या उत्साहात तरूणाईने मतदानाचा हक्क बजावला.
पुणे जिल्हा, शहराचा विकास करण्याची क्षमता असलेला नेता निवडून आला पाहिजे. पहिल्यांदा मतदान करणार असल्याने उत्सुकता हाेती. खूप आनंद वाटला यापुढील निवडणुकांमध्येही मतदान करणार आहे. - याेगेश काळुराम जानकर, वय २१
मतदान केंद्राच्या आतमध्ये कशाप्रकारे कार्य चालते हे पहिल्यांदा अनुभवले. काेणते उमेदवार उभा आहेत याची माहिती घेतली तसेच कुटुंबियांशी चर्चा केली हाेती. काेण आमच्या भागातील प्रश्न साेडवू शकताे? विकास कामे करेल याचा विचार करून घरातून निघतानाच काेणत्या उमेदवाराला मत द्यायचे ठरवून आले हाेते. - ऐश्वर्या बाळासाहेब शेलार, वय २५
माझ्या बालपणाची शाळा असल्याने मतदान करताना काेणतेही दडपण जाणवले नाही. नगरपालिका निवडणुका लांबल्याने माझे मतदार यादीत नाव नाेंदवून पहिल्यांदा मतदानासाठी अनेक वर्षे वाट पहावी लागली. - निखिल सुभाष कामठे, वय २५
बारामती मतदारसंघात काेण- काेण उमदेवार उभा आहेत. त्यांनी पूर्वी काय काम केले आहे ? भविष्यात शहराच्या आणि राज्याच्या विकासासाठी ते याेगदान देउ शकतात का? याचा विचार केला. आज पहिल्यांदाच मतदान केल्याचा खूप आनंद वाटताेय. - आदिती कुणकेकर, वय २२
मी पहिल्यांदा मतदान केले. मतदान केंद्रात येण्यापूर्वी सर्व उमेदवारांबद्दल माहिती घेतली हाेती आणि अगदी सहजपणे मतदानही केलं. खूप चांगले वाटत आहे. - फाहेदा शाहरूख शेख वय- १९
कुटुंबियांनी विशेष करून माझ्या आईने मी मतदान करावे यासाठी मला प्राेत्साहित केले. समाजातील सर्व घटकांचा विचार करणारा चांगला उमेदवार निवडून आला पाहिजे. देशात लाेकशाही टिकण्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तरूण वर्गाने पुढे आले पाहिजे. - आदिती अशाेक गाेसावी वय- १९