नीरा : ‘हर बोला, हर हर महादेव’ असा जयघोष करीत ढोल-लेझिमाच्या गजरात, गुलाल-खोबऱ्याची उधळण करीत उघड्या अंगाने बाभळीच्या काट्यांच्या ढिगामध्ये पाण्यात सूर मारावा अशा उड्या घेऊन काट्यांमध्ये लोळणारे पुरुषभक्तांचे अक्षरश: अंगावर काटाच आणणारे रोमांचक दृश्य सोमवारी नीरानजीक मौजे गुळुंचे (ता. पुरंदर) येथील ‘काटेबारस’ या प्रसिद्ध यात्रेत हजारो भाविकांनी प्रत्यक्ष अनुभवले. पुरंदर तालुक्यातील नीरा शहरापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गुळुंचे येथील जागृत देवस्थान श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त कार्तिक शुद्ध द्वादशीला मोठ्या उत्साही, भक्तिमय वातावरणात ‘काटेबारस’ साजरी झाली. ‘काटेबारस’ या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या यात्रेला राज्याच्या विविध भागातून भाविक आले होते. ज्योतिर्लिंगाची पालखी रविवारी एकादशी दिवशी दुपारी नीरास्नानासाठी वाजतगाजत रथातून नीरा नदीकाठी आणण्यात आली. नीरा नदीच्या पैलतीरावर दत्तघाट परिसरात नदीपात्रातील पवित्र तीर्थामध्ये ज्योतिर्लिंग देवाच्या मुखवट्यांना नीरास्नान घालण्यात आले. सोमवारी पहाटेपासून गुळुंचेमधील असंख्य भाविकांनी प्रथेनुसार देवाला उघड्या अंगाने दंडवत घातले. दुपारी साडेबाराच्या सुमाराला देवाच्या पालखीने बहिणीच्या (काठीच्या) भेटीसाठी टाळ-मृदंगाच्या व ढोलताशाच्या गजरात ज्योतिर्लिंग मंदिरापासून प्रस्थान केले. पालखीच्या भव्य सोहळ्याने काठीला प्रदक्षिणा घालून आरती केली. मंदिरासमोरील प्रांगणात बाभळीच्या काट्यांचा भाविकांनी ढीग रचला. सुमारे तासाभराच्या कालावधीनंतर पालखीचे मंदिरासमोर रचलेल्या काट्यांच्या ढिगाकडील प्रांगणात आगमन झाले. पालखी सोहळ्याने अत्यंत उत्साही भक्तिमय वातावरणात नामघोष करीत काट्यांच्या ढिगाऱ्याला प्रथेप्रमाणे ५ प्रदक्षिणा घालून पालखी मंदिरात नेण्यात आली. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड झुंबड उडाली होती. (वार्ताहर)
गुळुंचे येथे ‘काटेबारस’ यात्रा उत्साहात
By admin | Published: November 24, 2015 12:47 AM