पुणे : घोले रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ७, १४ आणि १६मध्ये काही किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान झाले़ सोसायटी भागात सकाळी मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत होता, त्याच वेळी झोपडपट्टी भागातील मतदान केंद्रांवर शुकशुकाट दिसत होता़ मात्र, दुपारी ४ नंतर या मतदान केंद्रांवर अचानक मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली़ त्यामुळे मतदानाची वेळ सायंकाळी साडेपाच वाजता संपत असताना काही केंद्रांवर जवळपास १०० पर्यंत मतदार रांगेत असल्याचे दिसत होते़ वडारवाडी येथील स्वामी रामदास शाळेत सायंकाळी साडेसहापर्यंत तर, गोखलेनगरमधील विखे पाटील शाळेतील एका मतदान केंद्रावर साडेसात वाजेपर्यंत मतदान सुरु होते़ तरीही या ठिकाणी केवळ ४३़९३ टक्के मतदान झाले होते़ घोले रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत तीनही प्रभागांत मिळून साधारण ५१ टक्के मतदान झाले़़ सकाळी मतदान सुरु होत असतानाच प्रभाग क्रमांक ७ मधील कामायनी विद्या मंदिरमधील एका मतदान केंद्रात ईव्हीएम मशीनवरील तारीख रात्रीची दाखवत होते़ त्यामुळे मतदान सुरु होण्यापूर्वीच ते मशीन बदलण्यात आले़ प्रभाग क्रमांक १६ मधील शिवाजी आखाडा व कसबा पेठेतील मनपा शाळेतील बॅलेट युनिटवरील बटणे दाबताना जड जात असल्याच्या तक्रारी आल्या़ त्यामुळे तेथील बॅलेट युनिट बदलण्यात आले़ हा अपवाद वगळता संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली़ मतदानाला सुरुवात झाली तेव्हा सोसायटीचा भाग असलेल्या मॉडेल कॉलनी, सेनापती बापट रोड, प्रभात रोड, भांडारकर रोड, शिवाजी हौसिंग सोसाटी परिसरातील मतदान केंद्रांवर सकाळीच मतदारांनी रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला़ त्याच वेळी झोपडपट्टी भागातील मतदान केंद्रांवर गर्दी अतिशय तुरळक होती़ प्रभाग क्रमांक ७मधील शिवाजी हौसिंग सोसायटी, विद्या भवन परिसरातील केंद्रावर सकाळी पहिल्या दोन तासांत दहा टक्क्यांवर मतदान झाले होते़ गणेशखिंड रोडवरील शासकीय तंत्रनिकेतनमधील मॉडेल कॉलनी, सेनापती बापट रोड, अशोकनगर परिसराच्या केंद्रात सकाळी साडेअकरापर्यंत ३२ टक्के मतदान झाले होते़ त्याच वेळी गोखले रोड, आनंद यशोदा सोसायटीच्या मतदान केंद्रात साडेअकरापर्यंत १८ टक्के मतदान झाले होते़ गोखलेनगरमधील अक्षरनंदन शाळेमधील काही मतदान केंद्रांत साडेअकरा वाजेपर्यंत २८ टक्के मतदान झाले होते़ अशीच साधारण परिस्थिती या तीन प्रभागांत दिसून येत होती़ जनवाडीतील जनता वसाहतीचा भाग असलेल्या मतदान केंद्रात सकाळच्या वेळी एकदम शुकशुकाट होता़ पण, दुपारी साडेचारनंतर मतदार गटागटाने येऊ लागल्याने सर्वच मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्याचे दिसत होते़ अशीच परिस्थिती शिवाजी आखाडा, मंगळवार पेठ, येथे सायंकाळी उशिरा गर्दी झाली होती़ (प्रतिनिधी)
सोसायटी भागात सकाळीच उत्साह
By admin | Published: February 22, 2017 3:28 AM