पुणे (धायरी) : सध्या सर्वत्र लगीनघाई सुरू आहे. आणि लग्न म्हटले की नटणे- थटणे आणि सोन्याचे दागिने घालून मिरवणे हे ओघाने आलेच. पण याच संधीचा फायदा घेण्यासाठी चोरटे देखील तितकेच तयारीत असतात. मात्र पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या लग्न सोहळ्यात सोन्याचेदागिने चोरीला गेल्याची घटना घडली. अन् त्यानंतर पोलिसात तपासात जे सत्य समोर आले ते पाहून सगळ्यांचीच एकच खळबळ उडाली.
पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे एक लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र, खडकवासला परिसरात राहणारी ३८ वर्षीय महिला लग्नासाठी सोमवारी आली होती. आणि याच दरम्यान तिचे एक ना दोन तब्बल १० तोळे सोने लंपास झाल्याची घटना घडली. आणि कार्यक्रम स्थळी एकच खळबळ उडाली. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. आणि पोलीस तपासात एक धक्कादायक खुलासा समोर आला. तो म्हणजे या महिलेचे सोने चक्क वर बापानेच लंपास केले होते.
सिंहगड रस्ता पोलिसांनी अवघ्या चार तासांत तपास करून १० तोळे सोने जप्त केले. याप्रकरणी दत्ता दगडू गोऱ्हे (घुलेनगर, वडगांव बुद्रुक, पुणे) यांस पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत ३८ वर्षीय महिलेने सिंहगड रस्ता पोलिसांत तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खडकवासला परिसरात राहणारी ३८ वर्षीय महिला आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी सोमवारी वडगाव बुद्रुक परिसरात आली होती. सोमवारी हळदी समारंभ असल्याने फिर्यादी महिला ही आपल्या वडगांव बुद्रुक येथील भावाच्या घरी मुक्कामास होती. फिर्यादी महिलेने लग्नात घालण्यासाठी आपले १० तोळे सोन्याचे दागिने सोबत आणले होते. आरोपी व फिर्यादी महिलेचे घर शेजारी असल्याने हळदी समारंभासाठी फिर्यादी व त्यांच्या भावाच्या घरातील सर्वजण गेले होते. दरम्यान फिर्यादी महिलेच्या भावाच्या घराचे दार उघडे असल्याने आरोपी दत्ता गोरे हे घरात शिरून कपाटात ठेवलेले २ लाख ४४ हजार ६६५ रुपयांचे १० तोळे सोन्याचे दागिने घेऊन गेला. लग्नाच्या दिवशी सोने घालण्याच्या उद्देशाने फिर्यादी महिलेने कपाटात दागिने तपासले असता ते चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने त्यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विलास धोत्रे यांनी तपासाची चक्रे फिरवत त्यांनी अवघ्या चार तासांत आरोपी असणाऱ्या नवरदेवाच्या पित्याकडून १० तोळे सोने जप्त केले. सुरुवातीला आरोपीने स्वतःच्याच मुलाच्या लग्नात कोण चोरी करणार? अशी उडवा- उडवीची उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करीत होता.त्यावेळी पोलिसांनी ' पोलीस खाक्या ' दाखवताच त्याने गुन्हाची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलिस आयुक्त पोमजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक विलास धोत्रे, पोलीस कर्मचारी विशाल गवळी, दयानंद तेलंगे यांनी केली.