डाॅ.अनिता अवचट यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिल्या जाणा-या डाॅ.अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कारांचे वितरण मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि अभिनेते डाॅ. मोहन आगाशे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी डाॅ. अशोक बेलखोडे आणि टिंकेश काैशिक यांना यंदाचा डाॅ.अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान प्रदान करण्यात आला. सोहळ्यानंतर ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ डाॅ. आनंद नाडकर्णी पुरस्कारर्थींशी संवाद साधत त्यांचा संघर्षमय जीवनपट उलडगडला. यावेळी लेखक अनिल अवचट, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर आदी उपस्थित होते.
डाॅ. बेलखोडे म्हणाले, ''बाबा आमटे यांनी पेरलेला विश्वास निराशा येऊ देत नाही. निष्ठा आणि समर्पणाचा भाव मनात असल्याने हे कार्य पुढे जाईल. समाजातील प्रश्न बदलत आहेत. एकट्या माणसाकडून ते प्रश्न सुटणारे नाहीत. समुहाने एकत्र येऊन या प्रश्नांना भिडणे आवश्यक आहे. किनवटला अत्याधुनिक रूग्णालय उभारण्याचे स्वप्न उराशी बाळगून मी मार्गक्रमण करीत आहे. श्रीकर परदेशी यांच्या प्रयत्नातून पाच एकर जागा मिळाली असून हॉस्पिटल उभारण्याचे काम सुरू झाले आहे. विचारांनी भारावलेली आणि संस्कार करणारी पिढी कमी होत चालल्याने खेड्यांमध्ये येऊन काम करण्यास डॉक्टर तयार नाहीत. खेड्याकडे येऊन डॉक्टरांनी सेवा द्यावी, यासाठी मी प्रयत्नशील आहे.''
टिंकेश कौशिक म्हणाले, ''प्रत्येकाच्याच आयुष्यात संघर्ष येतो. आज मला मिळालेल्या या पुरस्कारामुळे माझ्या संघर्षाला चेहरा मिळाला आहे. वयाच्या नवव्या वर्षी विजेचा शॉक लागल्याने मला हे अपंगत्व आले. परंतु, या खचून न जाता त्याचा स्वीकार केल्यामुळे संघर्षाची धार कमी झाली. मी आजही माझ्यातील क्षमता बोलून, पटवून सांगण्यापेक्षा कृतीतून सिद्ध करण्यावर अधिक भर देतो.''
डॉ. मोहन आगाशे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी आनंदयात्री या ई मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.