पुणे : आधीच रुग्णांची उपचारादरम्यान होणारी हेळसांड, वैद्यकीय यंत्रणांमधील अपुऱ्या सुविधा, समन्वयाचा अभाव यांसारख्या विविध कारणांमुळे आधीच टीकेचे धनी झालेले जम्बो कोविड रुग्णालयाचा गाडा आत्ता कुठे सुरळीतपणे सुरु झाला होता. परंतु, पुन्हा एकदा हे जम्बो हॉस्पिटल चर्चेत आले आहे. या रुग्णालयातील एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेली एक तरुणी अचानक झाली आहे. मागील २७ दिवसांपासून तिचा कुटुंबाशी कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. तसेच रुग्णालय प्रशासनाकडे याबाबत चौकशी केली असता त्यांनी जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे जम्बो हॉस्पिटलबाहेर धरणे आंदोलनाला सुरुवात करत खुद्द मुख्यमंत्र्यांनीच याप्रकरणी लक्ष घालून माझ्या मुलीला परत मिळवून द्यावे, अशी मागणी तरुणीच्या आईने केली आहे.
पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत याकरिता शिवाजीनगर येथील सीईओपी कॉलेजच्या मैदानावर जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले. मात्र सुरुवातीपासूनच हे हॉस्पिटल विविध कारणाने चर्चेत आले. आता या कोविड सेंटरमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडला आहे. या सेंटरमध्ये उपचारासाठी प्रिया गायकवाड ही तरुणी दाखल झाली होती. पण तब्बल २७ दिवस होऊन गेल्यावर सुद्धा ह्या तरुणीचा कुटुंबाशी आजतागायत कुठलाही संपर्क झालेला नाही. त्यामुळे चिंताग्रस्त कुटुंबाने आपल्या मुलीबाबत केलेल्या चौकशीला प्रशासनाने आम्हाला माहित नाही अशी उडवाउडवीची उत्तर देत हात वर केले. त्यामुळे ह्या तरुणीच्या आईने धरणे आंदोलनाला बसत थेट प्रशासनाला जाब विचारला आहे.
याबाबत तरुणीची आई म्हणाली, “ माझ्या प्रिया नावाच्या मुलीला २९ ऑगस्टला जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर डॉक्टरांनी मुलीला १३ सप्टेंबरला डिस्चार्ज देण्यात येईल सांगितले होते. मात्र तारखेला ज्यावेळी मुलीला नेण्यासाठी येथे आले . तेव्हा मात्र रुग्णालय प्रशासनाने तुमची मुलगी उपचारासाठी येथे नाही असे उत्तर दिले. त्यानंतर वारंवार रुग्णालय प्रशासनाकडून माझ्या मुलीविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र प्रत्येकवेळी मला उडवाउडवीची उत्तर मिळाली.माझ्या मुलीसोबत नेमके काय घडले याची चिंता वाटते आहे. आज २७ दिवस झाले तरी माझं तिच्याशी बोलणं झालेलं नाही, त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनीच यामध्ये लक्ष घालून माझी मुलगी मला मिळून द्यावी”
पुण्यातील शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरमधून प्रिया गायकवाड नावाची तरुणी अचानक गायब कशी होते. त्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाकडून तरुणीच्या कुटुंबाच्या शंकेचे निरसन न करता त्यांना उडवा उडवीचे उत्तरे देत आहे. आपल्या मुलीच्या न्यायासाठी तिचे आई-वडील उपोषणाला बसतात ही धक्कादायक बाब असून राज्य सरकार महिलांसाठी कोविड सेंटरमध्ये ठोस उपाययोजना का करीत नाही ? असा प्रश्न भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला आहे.