राजगुरुनगर : खेड तालुक्याच्या राजगुरुनगर येथील केटीईएस इंग्लीश मेडियम स्कूलच्या झूम ऑनलाईन क्लास चालू असताना अश्लील व्हिडिओ प्रसारित झाल्याने खळबळ उडाली. या प्रकारामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थीनिंना धक्का पोहचला असून पालकांमध्ये तीव्र नाराजी उमटली आहे. या घटनेबाबत मुख्यध्यापिका ज्योती ठाकूर यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
शाळेच्या एक शिक्षिका ३० जुलैला साडेबारा वाजता 'झूम' ॲपच्या लिंकद्वारे दहावीच्या विद्यार्थ्यांशी कनेक्ट होऊन शिकवू लागताच, लेक्चरबरोबर अश्लील व्हिडिओ चालू झाला. त्यामुळे या लिंकद्वारे शिकण्यासाठी कनेक्ट झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना धक्का बसला. त्यातील अनेकांनी लगेच पालकांच्या निदर्शनास ही गोष्ट आणली .संबंधित घटनेची आम्ही माहिती घेतली असून रितसर कायदेशीर तक्रार करणार आहोत. कुणीतरी सायबर गुन्हेगाराने हॅकिंगद्वारे त्या लिंकमध्ये घुसून हा गुन्हा केला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस यंत्रणा त्याचा छडा लावेल, असे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यान, याबाबत काही पालकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या असून संबंधित शाळा लॉकडाउन काळातील फी साठी गेल्या वर्ष दीड वर्षांपासून आम्हाला वसुलीसाठी तगादा लावत आहे. आमच्या पाल्यांचे शैक्षणिक निकालही रोखून धरले आहेत. ऑनलाइन शिक्षणवर्गाच्या नावाखाली आमचा आणि विद्यार्थ्यांचा असा मानसिक छळ करत आहे. यामुळे मुले नैराश्यग्रस्त झाली आहेत. अशी प्रतिक्रिया दिली. शाळेने ऑनलाईन क्लासच्या देखरेखेची व्यवस्था करावी. तसेच ऑनलाईन शिक्षणासाठी हॅक होणार नाही, अशा प्रकारचे ॲप वापरावे, अशी पालकांची मागणी आहे.
संबंधित मुख्याध्यापक व शिक्षिकेस बोलावून घेऊन या घटनेची माहिती घेतो. हा सायबर क्राईमचा विषय आहे. त्यादृष्टीने पुढील कारवाई होईल, असे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी याबाबत सागितले. पंधरा दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने अश्लील फोटो लेक्चरदरम्यान टाकले गेले होते. पालकांच्या वतीने एका पालकाने यासंदर्भात संबंधित स्कूल, पंचायत समिती शिक्षण विभाग, पोलीस अधिकारी व शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार अर्ज केला आहे.