पुणे : मिरची पावडर, धना पावडर, हळद, शेंगदाणा, खाद्यतेल, तांदूळ (ब्रॅन्डेडसहित) या सर्व जीवनावश्यक वस्तू शासनाच्या जीएसटी करामधून वगळण्यात याव्यात, असे निवेदन दि पूना मर्चंट्स चेंबरच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच देण्यात आले आहे. याबाबत चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले, की मिरची पावडर, धना पावडर, हळद, शेंगदाणा, खाद्यतेल, तांदूळ या सर्व वस्तू सर्वसामान्य भारतीयांच्या नियमित वापरातील व आहारातील अत्यावश्यक वस्तू आहेत. या वस्तूवर यापूर्वी कोणत्याही स्वरुपाचे कर लावले जात नव्हते. परंतु शासनाने या सर्व वस्तूना वस्तू व सेवा कर (जीएसटी) लावल्याने भावामध्ये वाढ झाली आहे. जीवनावश्यक वस्तू सर्वसामान्य व्यक्तींच्या आवाक्यात राहण्यासाठी या वस्तूवरील जीएसटी रद्द करावा, अशी प्रमुख मागणी मर्चंट्सच्या वतीने करण्यात आली आहे. याशिवाय करप्रणालीत वारंवार भराव्या लागणाऱ्या (महिन्यातून तीनदा) रिटर्नस् मुळेदेखील व्यापारी प्रचंड हैराण आहेत. त्यामुळे शासनाने जीएसटी रिटर्नस (खरेदी-विक्रीची माहिती) भरण्यासाठी मुदत किमान दर तीन महिने करावी, वस्तू सेवा कर प्रशासकीय सल्लागार मंडळाने त्वरित निर्णय घेणे, आदी अनेक मागण्या करण्यात आल्या असल्याचे पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले.
जीवनावश्यक वस्तू जीएसटीमधून वगळा; दि पूना मर्चंट्स चेंबरचे पंतप्रधानांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:53 PM
सर्व जीवनावश्यक वस्तू शासनाच्या जीएसटी करामधून वगळण्यात याव्यात, असे निवेदन दि पूना मर्चंट्स चेंबरच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच देण्यात आले आहे.
ठळक मुद्दे'जीएसटी रिटर्नस (खरेदी-विक्रीची माहिती) भरण्यासाठी मुदत किमान दर तीन महिने करावी'वस्तू सेवा कर प्रशासकीय सल्लागार मंडळाने त्वरित निर्णय घेणे : पोपटलाल ओस्तवाल