नसरापूर : प्रस्तावित पुणे रिंगरोडला विरोध दर्शविण्यासाठी केळवडे (ता. भोर) येथे रिंगरोडला विरोध कायम ठेवत रिंगरोडविरोधी कृती समितीच्या वतीने प्रांताधिकारी तहसीलदार व एमएसआरडीएचे अधिकारी यांनी आयोजित केलेल्या रिंगरोड शंका-निरसन बैठकीत काळ्याफिती लावून शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला.
केळवडे (ता. भोर) येथे रिंगरोडबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी प्रांताधिकारी तहसीलदार व एमएसआरडीएचे अधिकारी यांनी रिंगरोडबाधित शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीस काळ्याफिती लावून उपस्थित राहून शेतकऱ्यांनी रिंगरोडला विरोध कायम ठेवला व रिंगरोडमधून बागायती क्षेत्र वगळावे असा प्रस्ताव प्रशासनासमोर ठेवला. त्यावेळी या प्रस्तावावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन भोर प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिले आहे.
रिंगरोडबाधित शेतकऱ्यांसाठी झालेल्या या बैठकीच्या वेळी भोर प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार अजित पाटील, रस्ते विकास मंडळाचे संदीप पाटील हे माहिती देण्यासाठी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या बाजूने शिवसेनेचे कुलदीप कोंडे,भाजपाचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, केळवडेचे माजी सरपंच शांताराम जायगुडे, पोलीस पाटील वैशाली जगताप, शुभांगी इवरे, महेश कोंडे, जितेंद्र कोंडे आदी बाधित शेतकरी विरोधासाठी काळ्याफिती लावून उपस्थित होते.
रस्ते विकास मंडळाचे संदीप पाटील यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून रिंगरोडची रचना व संपादित होणारी जमीन याची माहिती देत असताना उपस्थित शेतकऱ्यांनी आम्ही प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी नाही तर विरोध करण्यासाठी आलो असल्याचे अधिकाऱ्यांना सूचित केले.
जीवन कोंडे यांनी रिंगरोडला विरोध दर्शवताना या रिंगरोडमध्ये पूर्वापार जिवापाड जपलेल्या बागायती जमीन जात असून त्या आम्ही देणार नाहीच. त्याऐवजी हा रस्ता माळेगाव येथून डोंगरपायथ्याच्या जिरायती भागातून व्हावा तेथील शेतकऱ्यांना चांगला मोबदला द्यावा, असा प्रस्ताव मांडला.
तर शुभांगी इवरे यांनी या वेळी बोलताना कोणत्याही शेतकऱ्यांना नोटिशी न देता रिंगरोड मोजणीचे कामकाज सुरू असल्याचा आरोप करून शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या हरकतीवर निर्णय कधी होणार? हा सवाल उपस्थित केला.
प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी बैठकीत मांडलेल्या मार्ग बदलाच्या, तसेच मोबदल्याच्या प्रस्तावावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा केली जाईल अशी ग्वाही दिली.
केळवडे (ता.भोर) येथे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांना निवेदन देताना केळवडे येथील रिंगरोडबाधित शेतकरी.