पुणे : उद्यानांमध्ये किंवा शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये, खासगी संस्थांमध्ये असलेल्या पुतळ्यांच्या परिसरात रखवालदार असल्याने काही अंशी या पुतळ्यांवर देखरेख ठेवणे शक्य आहे. तरीही शहराच्या विविध भागात असलेल्या तब्बल ९० पूर्णाकृती आणि अर्धपुतळ्यांच्या देखरेखीबाबत, सुरक्षिततेबाबत शासनाने किंवा पुतळा बसविणा-या संबंधितांनी कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे मंगळवारी दिसून आले. विशेषत: मध्यवर्ती पुण्यात महापुरुष, राजकीय नेते, उद्योगपती, धार्मिक व्यक्ती, समाजसेवक यांचे पुतळे किंवा अर्धपुतळे अनेक ठिकाणी आहेत. ९० पैकी १३ पुतळे पूर्णाकृती असून पुणे महानगरपालिकेकडे सार्वजनिक ठिकाणच्या पुतळ्यांच्या परिसरात सुशोभिकरण, प्रकाशव्यवस्था आणि प्रसंगी स्वच्छता ही जबाबदारी आहे. खासगी संस्था, विद्यापीठे, निमसरकारी कार्यालये, सरकारी कार्यालये अशा ठिकाणी असलेल्या पुतळ्यांचा निश्चित आकडा पोलिसांच्या विशेष शाखेकडे तरी असेल किंवा कसे याबाबत शंका आहे. पुतळ्यांच्या विटंबनांच्या वाढत्या घटनांमुळे राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी ज्या संस्था,संघटनांना पुतळे स्थापन करावयाचे आहेत, त्यांनीच त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी असे सूचित केले होते. नव्याने पुतळे उभारणा-या संस्था, संघटनांना पुतळ्यांच्या देखभालीची, साफसफाईची जबाबदारी घेत असतील,तरच पुतळे बसविण्याला परवानगी देण्याचे शासनाचे, गृह विभागाचे धोरण आहे. मात्र सारसबागेगवळील माजी महापौर बाबुराव सणस यांच्या पुतळ्याची त्यांचे वंशज करत असलेली देखभाल वगळता अन्य पुतळ्यांच्या सुरक्षिततेबाबत उदासिनता असल्याचे दिसते. प्रत्येक ठिकाणी पोलीस किंवा रखवालदार नेमणे संबंधित यंत्रणेला शक्य नाही. पुतळ्यांच्या सुरक्षिततेबाबत संबंधित संस्थांना सुचना देण्याचे अधिकार पोलिसांना आहेत, मात्र त्यांचा वापर पोलिसांनी आजवर फारसा केलेला नाही. सार्वजनिक रस्त्यांच्या कडेला किंवा मध्यभागी असलेल्या पुतळ्यांच्या बाबत सुरक्षिततेच्या संदर्भात संवेदनशीलता अधिक आहे. काही दुर्घटना झाल्यास पोलीसांना गुन्हे नोंदवून त्या ठिकाणी अनेक दिवस बंदोबस्त ठेवावा लागतो. संभाजी उद्यानातील दुर्घटनेनंतर मंगळवारी शहरातील अनेक पुतळ्यांच्या परिसरात गस्त घालण्यात आली. किंवा बंदोबस्त नियुक्त करण्यात आला. (प्रतिनिधी)रस्त्यावरील पुतळ्यांची काळजी कोणालाही नाही : रणपिसे महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाचे प्रमुख प्रशांत रणपिसे म्हणाले, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन अशा राष्ट्रीय सणांच्या दिवशी किंवा ज्यांचा पुतळा आहे, त्यांच्या जयंती, पुण्यतिथीच्या दिवशी पुतळे पाण्याने धुण्याचे आदेश पालिका मुख्यालयाकडून अग्निशमन दलाला प्राप्त होते. त्या त्या वॉर्ड कार्यालयाने पुतळ्यांचा परिसर सुशोभित करणे, प्रकाशयोजनेची व्यवस्था करणे अपेक्षित आहे. महापालिकेच्या उद्यानांमधील पुतळ्यांची सुरक्षितता रखवालदार, शिपायांमुळे शक्य आहे.
पुण्यातील पुतळ्यांची सुरक्षितता बेदखल
By admin | Published: January 04, 2017 5:25 AM