पुणे : राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रिंगरोडसाठी भोर तालुक्यातील पाच गावांमधून होत असलेला विरोध लक्षात घेता ही गावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी अन्य चार गावांचा समावेश करण्यात आला असून, त्यासाठी रिंगरोडची रचना बदलण्यात आली आहे. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या दोन गावांमधील भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे.
भोर तालुक्यातील रिंगरोडविरोधी समितीच्या पाठपुराव्यामुळे रिंगरोडच्या पश्चिम भागातील भोर तालुक्यातील कांजळे, केळवडे, कांबरे, खोपी आणि नायगाव ही पाच गावे वगळण्यात आली आहेत. त्याऐवजी खोपी, रांजे, कुसगाव, शिवरे या नव्या गावांचा समावेश करण्यात आला आहे. यात खोपी गावाचा पुन्हा समावेश असला तरी या गावातील अन्य गट क्रमांक असलेली जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्यामुळे रिंगरोडची सध्या असलेली रचना बदलण्यात आली आहे. या गावांतील जमिनींचे संपादनही काही प्रमाणात पूर्ण करण्यात आले आहे.
पूर्वेकडील भूसंपादनाला सुरुवात
हा रिंगरोड हवेली, मावळ, मूळशी, भोर, तसेच खेड तालुक्यातून जातो. त्यासाठी पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यांत काम सुरू आहे. त्याबाबत पश्चिम भागातील भूसंपादन जवळपास पूर्ण होत आले आहे, तर पूर्वेकडील भूसंपादनास सुरुवात झाली आहे. गावे वगळल्यानंतर आता रिंगरोडची रचना बदलण्यात येणार असून, त्याबाबत लवकरच अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.
सातबाऱ्यावर रिंगराेडसाठी राखीव अशी नाेंद
नव्याने समाविष्ट झालेल्या रांजे आणि कुसगावातील जागांचे संपादन पूर्ण झाले आहे, तर खोपी व शिवरे या गावांतील संपादन बाकी आहे. खोपीतील गट क्रमांकांची मोजणी पूर्ण झाली असून, शिवरे गावाची मोजणी अद्याप बाकी आहे. या पाच गावांतील जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर रिंगरोडसाठी राखीव अशा नोंदी करण्यात आल्या होत्या. या निर्णयानंतर ही नोंद रद्द करण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे. सातबारा उताऱ्यावरील शेरे उठविल्यानंतर या जमिनींची खरेदी-विक्री करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, तसेच इतर हक्कातील बोजे निघाल्याने शेतकऱ्यांना कर्ज घेणे शक्य होणार आहे.
भोर तालुक्यातील पाच गावे वगळण्यात आली आहेत. त्या गावांऐवजी नव्या रचनेत खोपी गावाचा पुन्हा समावेश करण्यात आला असला तरी त्यातील गट क्रमांक वेगळे आहेत, तसेच रांजे, कुसगाव यांचे संपादन पूर्ण झाले आहे, तसेच खोपी आणि शिवरे यांचे संपादन बाकी आहे
राजेंद्र कचरे, उपविभागीय अधिकारी, भोर