सुषमा नेहरकर-शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आरोग्य सेवा, म्हाडा आणि टीईटी पेपरफुटीनंतर आता राज्यात बोगस नोकरभरती प्रकरणाची पोलखोल झाली आहे. राज्यस्तरीय खेळांची बोगस प्रमाणपत्रे मिळवून तब्बल ३५० हून अधिक जणांनी विविध विभागात वर्ग एक, पीएसआय, नायब तहसीलदार अशा उच्च पदाच्या नोकऱ्या हडपल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकीत सहायक गणेश नानासाहेब कांबळे यांना नोकरीतून काढून टाकण्यात आले. या प्रकरणी क्रीडा विभागाने साडेचार हजार पानांचा अहवाल तयार केला आहे. त्यात २५८ बोगस प्रमाणपत्रे वाटल्याची आणि त्यापैकी ५०हून अधिक बोगस खेळाडू सध्या नायब तहसीलदार, क्लास वन, क्लास टू, पीएसआयसह अन्य ठिकाणी उच्चपदी नोकरी करत असल्याची धक्कादायक माहिती असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पहिली कारवाई
क्रीडा विभागाने सहा जणांची समिती स्थापन करून चौकशी केली तसेच सुनावणी घेतली. गणेश कांबळे यांनी पाॅवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप २०१३ मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत १०५ किलो गटात तिसरा क्रमांक पटकावल्याचे बोगस प्रमाणपत्र दिले आहे. क्रीडा विभागाच्या अहवालानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी कांबळे यांच्यावर कारवाई करत नोकरीतून काढून टाकले.
बोगस तलवारबाजीवर ११ जण ‘पीएसआय’
तलवारबाजीचे बोगस प्रमाणपत्र मिळवून ११ जण पीएसआय झाले. यात अनेक अधिकारी अडकल्याचे सूत्रांनी सांगितले.
पगाराची वसुली कोण करणार?
खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे नोकऱ्या करून कोट्यवधींचा पगार घेतला. भत्ते घेतले. हा पगार शासन वसूल करणार का, असा प्रश्न आहे.
‘सॉफ्ट बॉल’चा घोळ
एक नायब तहसीलदार आणि एका ‘क्लास-टू’ अधिकाऱ्याने सॉफ्ट बॉल स्पर्धेत राज्यस्तरीय प्रमाणपत्र मिळवल्याची कागदपत्रे दिली होती. चाचणीत सॉफ्टबॉल म्हणजे काय, हेही त्यांना सांगता आले नाही. वजन उचलण्याची खोटी प्रमाणपत्रेही सादर करण्यात आली. स्वत:चे वजन ४० किलोही नाही अशांनी १०५, १२५ किलो वजन उचलल्याचे प्रमाणपत्र दिले.