Exclusive : पूजा चव्हाण प्रकरणी हाती महत्वाचे धागेदोरे; भाजप जाणार हायकोर्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 06:09 PM2021-03-03T18:09:29+5:302021-03-03T18:12:03+5:30
पूजा चव्हाण प्रकरणी भाजप हायकोर्टात जाणार
प्राची कुलकर्णी -
पुणे : पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी भाजप आता थेट हाय कोर्टात जाणार आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून सखोल तपासणी केली जावी यासाठी आता थेट हायकोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे.
शिवसेना नेते संजय राठोड यांच्या समोरच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास करावा यासाठी आता भाजप थेट हायकोर्टाचे दरवाजे ठोठवणार आहे. पूजा चव्हाणचा व्हिसेरा खासगी प्रयोगशाळेकडुन तपासला जावा, या मध्ये तिच्या शारीरिक स्थितीचे, तिला कोणते आजार होते , काही शस्त्रक्रीया केली गेली होती का याबाबतची तपासणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांना तपासाचे आदेश दिले जावेत अशीही मागणी यामध्ये करण्यात येणार आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून ही याचिका दाखल केली जाण्याची शक्यता आहे.
याबरोबरच भाजपने संजय राठोड आणि पूजा चव्हाणचे कॉल रेकॅार्डस देखील काढले असुन ते देखील कोर्टात पुरावे म्हणून सादर केले जाउ शकतात अशी माहिती सत्रांनी दिली
यापूर्वीच पूजा चव्हाण प्रकरणी पुण्याच्या लष्कर कोर्टात दोन याचिका दाखल केल्या गेल्या आहेत. यामध्येही तपासाचे आदेश दिले जावेत अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच हेमंत पाटिल या सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील हायकोर्टात याचिका केली आहे. आता थेट पक्षाकडून ही याचिका दाखल केली गेल्यानंतर काय होतंय ते पहावे लागेल.
याबाबत चित्रा वाघ लोकमतशी बोलताना म्हणाल्या , '' पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आणखी काही माहिती हाती लागली आहे. आम्ही सभागृहात सध्या या प्रकरणी आवाज उठवतो आहोत.”