प्रज्ञा केळकर-सिंग
---------राज्य शासनातर्फे देण्यात येणारा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांना जाहीर झाला आहे. लोककला क्षेत्रामध्ये मी ज्यांना गुरुस्थानी मानले त्या विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाचा पुरस्कार जाहीर झाल्याने मला खूप आनंद झाला आहे, अशी भावना गुलाबबाई संगमनेरकर यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली. ...........................................
* लोककलेच्या क्षेत्राकडे कशा वळलात?
- माझा जन्म १९३३ सालचा. माझी आई लावणीच्या क्षेत्रात कार्यरत होती. आईची स्वतःची संगीत पार्टी होती. आईकडून मला कलेचा वारसा मिळाला. मी वयाच्या नवव्या वर्षी लावणीच्या क्षेत्रात आले. संगीत बारीपासून माझ्या कामाला सुरुवात झाली. काही काळाने ढोलकी-फडाच्या तमाशातही काम केले.
* तमाशा क्षेत्रातील कारकीर्द कशी घडत गेली?
- खानदेशमधील आनंदराव महाजन यांच्या तमाशात मी सर्वाधिक काम केले. हा महाराष्ट्राच्या इतिहासातला एकमेव तमाशा आहे की ज्यांचा एकेका गावात आठ दिवस किंवा महिनाभरही मुक्काम असायचा. तुकाराम खेडकर यांच्या तमशातही मी काम केले. त्यानंतर खानदेशमध्ये मी स्वतःची संगीत बारी सुरू केली. अंमळनेर, धुळे अशा विविध ठिकाणी संगीत बारी चालवली. पुढील काळात पुण्यातील आर्यभूषण थिएटरमध्ये काम केले.
* आतापर्यतच्या वाटचालीत मैलाचे दगड ठरलेले प्रसंग कोणते?
- दिल्लीत यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर सादरीकरण करण्याची संधी मला मिळाली. तो लावण्यांचा कार्यक्रम कायम लक्षात राहील. जळगाव आकाशवणीवरही लावण्या गाण्याची संधी मिळाली. लता मंगेशकर यांच्या अलबममध्ये प्रिया तेंडुलकर आणि लतादीदींच्या गप्पा, मग काही गाणी असे स्वरूप होते. 'राजसा जवळी जरा बसा' ही लावणी लतादीदींनी त्या अलबममध्ये गायली आणि मला अदाकारी करता आली. विश्रामबाग वाड्यात गाण्याचे चित्रीकरण झाले. माझ्या मुलीने वर्षा संगमनेरक हिनेही या गाण्यात माझ्या बरोबरीने सादरीकरण केले. २०१३ मध्ये कंगना राणावतसह मी 'रज्जो' सिनेमात काम केले. शेवटच्या काळात प्रकाश इनामदार आणि जयमाला इनामदार यांच्या 'गाढवाचं लग्न' या वगनाट्यामध्ये मी गायले.
* कारकीर्दीतला सुवर्णकाळ कोणता?
- माझी बहीण मीरा हिच्याबरोबर मी जे काम केले, तो सुवर्णकाळ होता असे मी म्हणेन. आम्ही दोघींनी मिळून खूप काम केले. आर्यभूषण थिएटरमध्ये गुलाब-मीरा संगमनेरकर या नावाने स्वतंत्र पार्टी जन्माला आली. मी लावणी गायचे आणि मीरा नृत्य करायची. प्रेक्षकांची खूप चांगली दाद मिळायची आणि काम करायला आणखी हुरूप यायचा. मीराच्या निधनानंतर मी एकाकी पडले. मीराशिवाय पार्टी सुरू करणे, ही कल्पनाही मला सहन होत नव्हती. त्यावेळी महाराष्ट्र शासनाने मुंबईत आंतरराष्ट्रीय टूरिस्ट प्रदर्शन भरवण्याचे नक्की केले. महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री मधुसूदन बेराळे यांनी करमणुकीच्या कार्यक्रमात एखादा लोकनाट्याचा कार्यक्रम सादर करण्याची इच्छा प्रदर्शित केली. नाट्य म्हणजे तमाशा हाच अर्थ त्यांना अभिप्रेत होता. मधुकर नेराळे यांनी माझ्या नावाचा आग्रह धरला. त्यासाठी ते स्वतः संगमनेरला आले. मला त्यांचा आग्रह मोडता आला नाही आणि पुन्हा कामाला सुरुवात झाली. माझा मुलगा रवी संगमनेरकर याने अकलूज संगीत महोत्सवात नृत्य दिगदर्शक म्हणून काम पाहिले. दुर्दैवाने त्याचे आणि नंतर दुसऱ्या मुलाचेही निधन झाले आणि मी खचले. आयुष्यात जसे खूप चांगले दिवस पाहिले, तसेच वाईट दिवसही पहावे लागले.
* राज्य शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल काय भावना आहेत?
- लोककला क्षेत्रामध्ये मी ज्यांना गुरुस्थानी मानले त्या विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाचा पुरस्कार जाहीर झाल्याने खूप आनंद झाला आहे. कलेची सेवा केली त्याचे सार्थक झाले. आयुष्याच्या उतरत्या काळात या पुरस्काराने आर्थिक आधारही मिळाला आहे. माझ्या कर्तृत्वावर सरकारी मोहोर उमटली याचा आनंद होतो आहे.
* लोककलावंतांची शासन दरबारी कशा प्रकारे दखल घेतली जावी?
- लोककला ही महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आहे. तमाशा हा महाराष्ट्राच्या कलेचा वारसा आहे. या कलेची आणि कलावंतांची शासन दरबारी योग्य दखल घेतली जावी. तमाशाचे अर्थकारण बिघडत चालले आहे, कलावंत कर्जबाजारी झाले आहेत. सक्रिय कलावंत आणि तमाशा फडांसाठी महामंडळ सुरू करावे आणि त्यांना आर्थिक मदत करावी, कमी दरात त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे.