- हेमंत बावकरशेअर बाजार हा तसा बेभरवशी कधी कोणाला रावाचा रंक करून सोडेल नेम नाही. परंतू, ठरवूनही रावाचा रंक करणारे याच बाजारात आहेत. आज एक अशी गोष्ट घेऊन आलोय की तुमचा विश्वासही बसणार नाही. तुम्हाला शेअर बाजाराचे ज्ञान नाही म्हणून तुम्ही कोणत्या ब्रोकरकडे तुमचे पैसे शेअर बाजारात गुंतवण्यास दिले असतील तर सावध व्हा. कसे ठकविले जाल हे तुम्हालाही कळणार नाही.
शेअर बाजाराचे धडे देणारे तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतात, तुमच्या पैशांची काळजी तुमच्याइतकी कोणी घेऊ शकणार नाही. त्यामुळे तुमचे पैसे कोणाकडे गुंतविण्यास देऊ नका. पण इथे काय होते, तुम्हाला तेवढा वेळ नसतो आणि ज्ञानही. यामुळे लोक शेअर ब्रोकर फर्म असतात त्यांच्याकडे कष्टाने कमविलेले पैसे देतात. इथेच त्यांचे फावते.
पुण्यातील नवविवाहित जोडप्यासोबत घडलेला हा प्रसंग आहे. खास माणसाच्या ओळखीने ते एका शेअर ब्रोकर कंपनीत चार- पाच लाख रुपये गुंतवितात. त्यांना तेव्हा महिन्याला दहा- वीस हजार रुपये फाय़दा देण्याचे आश्वासन दिले जाते. ती ब्रोकिंग एजंट नवविवाहितेच्या माहेरच्याच गावची होती. ते विश्वास ठेवतात. त्यांना कंपनीतून कन्फर्मेशनचा जेव्हा जेव्हा फोन येईल तेव्हा तेव्हा फक्त हो म्हणण्यास सांगितले जाते. म्हणजे जेव्हा ती ब्रोकर एजंट कोणतेही शेअर विकत घेईल किंवा विकेल तेव्हा कंपनी मूळ पैसे गुंतविणाऱ्यांना फोन करून विचारेल, तेव्हा त्यांनी हो म्हणत त्या ट्रान्झेक्शनला संमती द्यायची. हे संभाषण रेकॉर्ड होते. याचा वापर कसा होतो, ते पुढे आहे.
असेच काही महिने निघून जातात. सुरवातीला त्यांना फायदा झाल्याचे दाखविण्यात आले. परंतू तोटा झालेली ट्रान्झेक्शन दाखविण्यात आली नाहीत. म्हणजे ही लपवालपवी. त्याला जेव्हा जेव्हा फोन आले, तेव्हा तेव्हा त्याने ब्रोकिंग एजंटने सांगितल्या प्रमाणे हो म्हणत गेला. ट्रान्झेक्शन होत गेली. दोन-चार महिन्यांनी जेव्हा ते ऑफिसमध्ये गेले तेव्हा त्यांच्या खात्यावर केवळ पन्नास हजारच उरले. त्यांनी जेव्हा जाब विचारला तेव्हा त्या तरुणीने ते देखील त्याच दिवशी झिरो करून दाखविले. झाले सारे पैसे गेले.
आता हा अधिकृत स्कॅम कसा होतो पहा....ब्रोकिंग फर्म या तुम्ही गुंतविलेल्या पैशांवरील कमिशनवर जगतात. तेच त्यांचे उत्पन्न असते. त्या ब्रोकिंग एजंटला त्याने जेवढे पैसे गुंतविले किंवा शेअर विकून काढून घेतले की त्याचे कमिशन मिळते. आता भारतीय रुपयात ट्रेडिंग केले तर कमी कमिशन आणि डॉलरमध्ये शेअर घेतले तर जास्त. कसे असते नवीन गुंतवणूकदार असो की जुना, पैसेवाला असो की हजारात पैसे गुंतविणारा तो काही हजार-हजार शेअर एकावेळी घेत नाही. पन्नास, तीस, वीस असे वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर घेतो आणि तोटा झालाच तर सावध राहिल्याने कमी होईल आणि फायदा झाला तरी तो काहीसाच त्याला समाधान देणारा असा असतो.
ही शेअर ब्रोकिंग एजंट तरुणी चालाख होती. तिने कमिशन जास्त कमावण्यासाठी डॉलरमध्ये हजारा हजाराच्या संख्येने शेअर घेतले. शेअर बाजार पडत होता, त्यामुळे नवविवाहित जोडप्याचे पैसे बुडाले. एजंट तरुणीने कमिशनच्या हव्यासाने जास्तीत जास्त ट्रान्झेक्शन केले आणि अकाऊंट पुरते रिते करून सोडले.
तू फक्त हो म्हणचा वापर कसा होतो ते पहा...आता या जोडप्याच्या सारा प्रकार लक्षात आला. पैसे गेलेले होते, त्यांनीही काही जवळच्या मित्रांना तिथेच पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यांचेही बुडाले होते. या जोडप्याने त्या ब्रोकिंग फर्मच्या अधिकाऱ्याकडे तक्रार केली. त्याने सांगितले की, आमच्याकडे पुरावे आहेत तुम्हाला जेव्हा जेव्हा कन्फर्मेशन कॉल आला तेव्हा तेव्हा तुम्ही हो म्हणालात आणि आम्ही ट्रान्झेक्शन केले. यामुळे तुम्ही कुठे तक्रारही केली तरी तुमच्या हाती काही लागणार नाही.
आहे की नाही अधिकृत लुटण्याची खतरनाक ट्रीक... आता या स्टोरीमध्ये आणखी एक जबरदस्त गंमत आहे. या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना म्हणजेच ब्रोकिंग एजंटना एक ऑफर दिली होती. जो कोणी सर्वात जास्त कमीशन कमवून देईल म्हणजे तीन-चार लाख त्याला एक लाखभर रुपये किंमतीची स्कूटर गिफ्ट दिली जाईल. बंपर बक्षीसच हो. मग गेल्या महिन्यात ज्या तरुणीने ५०० रुपये पण कमिशन मिळविले नव्हते, तिने बंपर बक्षीसाच्या त्या महिन्यात तीन-साडेतीन लाख कमिशन कसे बरे कमवले असेल? तिला ती स्कूटर मिळाली की नाही... तिलाच माहिती. आता ही अधिकृत लुबाडणूक असल्याने त्याची तक्रारही पोलिसांत नोंद झाली नाही. पण या जोडप्याला मात्र चांगलाच फटका बसला आहे. यामुळे तुम्ही देखील सावध व्हा, तुमच्या पैशांची काळजी तुम्हीच घेऊ शकता.
Share Market Fraud Trick: