- सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे: रुबेल टिका हिंदू को अलग और मुस्लीम को अलग दे रहै हे, यह टिकेकाे देने के बाद हमारे बच्चे बच्चे पैदा नही कर सकते, मोदी सरकारने हमारी आबादी रोखणे के लीए यह टिका दे रहै हेै... असे सांगत पुणे शहरातील कोंढवा, हडपसर, मिठानगर, रामटेकडी, सय्यद नगर आदी भागातील सुमारे ४० महापालिका व खाजगी मुस्लीम शाळांमधील तब्बल १४ हजार विद्यार्थ्यांना रुबेला लस देण्यास पालकांनी नकार दिला आहे. पालकांना रुबेला लसीकरणाचे महत्व पटून देण्यासाठी प्रशासनाकडून अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. परंतु त्यानंतर देखील आपल्या पाल्यांना लस देण्यास पालकांनी नकार दिला आहे. यामुळे महापालिका प्रशासनासमोर मोठा पेच प्रसंग निर्माण झाला असून, थेट आयुक्तांनी मुस्लीम समाजातील प्रमुख व्यक्तींची बैठक घेतली आहे.
रुबेला लसीकरणामुळे मुलांना त्रास होता, ताप येतो म्हणून लस न देणा-या पालकांची संख्या देखील मोठी होती. परंतु शाळा, प्रशासन, डॉक्टरांच्या मार्फत अशा सर्व पालकांचे समुपोदेशन करुन अशा सर्व विद्यार्थ्यांना लस देण्यास प्रशासनाला यश आले आहे. शहरामध्ये २७ नोव्हेंबर २०१८ पासून गोवर रुबेल लसीकरण मोही सुरु आहे. शहरातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना गोवर रुबेला लसीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासनाने विविध पातळीवर ही मोहिम यशस्वी करण्याठी अनेक प्रयत्न केले आहेत. यामुळे आता पर्यंत शहरातील साडे सहा लाख बालकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरण पूर्ण करण्याची अंतिम मुदत १५ जानेवारी होती, परंतु अद्यापही २० ते २५ टक्के मुलांचे लसीकरण शिल्लक असल्याने या मोहिमेला मुदत वाढ देण्यात आली असून, आता २५ जानेवारी २०१९ अखेर पर्यंत शंभर टक्के मुलांना ही लस देणे आवश्यक आहे.
पुणे शहरातील कोंढवा हडपसर, मिठानगर,रामटेकडी, सय्यदनगर, या परिसरातील महापालिका आणि खाजगी मुस्लीम शाळांमधील मुला-मुलीच्या गोवर रुबेला लसीकरणासाठी प्रशासनाच्या पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. याबाबत आरोग्य विभागाच्या वतीने पालकांच्या अनेक बैठका घेण्यात आल्या. परंतु बैठकीत मुलांना त्रास होईल म्हणून नाही तर मोदी सरकारने आमची लोकसंख्या रोखण्यासाठीच ही लस आणली असून, आम्ही आमच्या मुलांना ही लस देणार नसल्याचे सांगितले. याबाबत प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधी, मुस्लीम समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींची देखील मदत घेतली आहे. परंतु अद्यापही पालक लसीकरण करून घेण्यास तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी मौलाना, विविध मस्जिदांच इमान, मिशनरी संस्थांचे प्रमुख, खाजगी शाळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, विविध वस्त्या, सोसायट्या अशा सर्व घटकांची बैठक घेऊन लसीकरणाचे महत्व पटवून दिले.